राज्य टेबल टेनिस स्पर्धेत मालवणच्या स्पर्धकांची अभिमानास्पद कामगिरी
*💫मालवण दि.०२-:* स्पर्धेला जाताना झालेल्या अपघातात जखमी होऊनही हार न मानता चिपळूण येथे जाऊन स्पर्धेचे ठिकाण गाठत राज्य टेबल टेनिस स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करण्याचा पराक्रम मालवणच्या स्पर्धकांनी केला आहे. संकट येऊनही आपली मेहनत वाया जाऊ न देता जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या या यशाबद्दल स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. दि. २५ मार्च रोजी दुपारी मुंबई-गोवा महामार्गावरील खारेपाटणपासून जवळ असलेल्या नडगिवे घाटीत मालवणातून चिपळूण येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला पाठीमागून येणाऱ्या अवजड मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह आठजण जखमी झाले होते. यात पावनी नीलकंठ मालणकर (१३), सईश मोहन उस्कैकर (१४), दिग्गज दीपक जाधव (१४) हिमानी जगदिश येरम (१५) ईशान नितीन वेंगुर्लेकर ( १३) हे पाच स्पर्धक जखमी झाले होते. त्यांच्यासोबत असलेल्या वैशाली गजानन कुडाळी (४८), दीपक धर्माजी जाधव (४९) जन रानोजी साठे (२५) वाहनचालकही जखमी झाले होते. अपघाताची माहिती मिळताच मालवण टेबल टेनिस अकॅडमीचे विष्णू कोरगावकर आणि हेमंत वालकर, जगदीश येरम, सुजाता येरम यांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे स्पर्धेत सहभागी होण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना एकाही स्पर्धकाने माघार न घेता प्राथमिक उपचारानंतर थेट चिपळूणला जाण्याचा निर्णय घेत स्पर्धेत सहभागही घेतला. या स्पर्धेत दिग्गज जाधव हा वयोगट १५-१७ मधून उतरताना उजव्या कानाला आणि मानेला झालेली दुखापत विसरून पाच सामने जिंकून उपांत्य फेरीत पराभूत झाला. १५ वर्षांखालील गटात त्याने ब्रॉन्झ पदकावर नाव कोरले. इशांत वेंगुर्लेकरने १५ ते १७ वर्षांखालील गटात खेळताना चार सामने जिंकून उपांत्यपूर्व लढतीत पराभव पत्करला. त्याच्या डाव्या हाताला प्लास्टर करण्यात आले होते. सईशा उस्कैकर हिच्या डाव्या पायाला आणि गुडघ्याला दुखापत झाली होती. तिने १७ वर्षांखालील गटात सहभाग घेताना अटीतटीच्या लढतीत पराभव पत्करला. पावनी मालणकर हिच्या डोक्याला, हाताला दुखापत झाली होती. तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत लढत दिली. हिमानी येरमने १५ ते १७ वयोगटात सहभाग नोंदविताना दोन सामने जिंकले. स्पर्धकांबरोबर दुसऱ्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्राची चव्हाणने १० वयोगटात सिल्वहर आणि ब्रॉन्झ पदक पटकावले. आर्या दिघेने दहा वर्षे वयोगटातून सुवर्ण पदक आणि १२ वर्षे गटातून सिल्व्हर मेडल पटकावले. ही स्पर्धा २६ व २७ मार्च रोजी झाली.
