संदेश पारकर:परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहासह इमारत परिसराचे सुशोभीकरण;सुमारे ५० लाख रुपये खर्चून काम पूर्ण..

⚡कणकवली ता.१६-: कणकवली नगरपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे ५० लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या परमपूज्य भालचंद्र महाराज सभागृहाचे तसेच नगरपंचायत इमारत परिसर सुशोभीकरण कामाचे उद्घाटन शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायत कार्यालय येथे होणार आहे,अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.
कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक बाळू पारकर, जयेश धुमाळे, जाई मुरकर, सुमेधा अंधारी, लुकेश कांबळे आदी उपस्थित होते.
नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभा, विशेष सभा तसेच स्थायी समितीच्या बैठका यापुढे नव्या आणि सुसज्ज सभागृहात पार पडणार आहेत. विधानसभा तसेच लोकशाही व्यवस्थेतील इतर महत्त्वाच्या सभागृहांच्या धर्तीवर या सभागृहाची रचना करण्यात आली आहे.
कणकवली शहराच्या लौकिकाला साजेसे असे सुंदर आणि प्रशस्त दालन उभारण्यात आले आहे. या नूतन सभागृहाच्या लोकार्पण सोहळ्यास नगरपंचायतीचे सर्व सत्ताधारी व विरोधी पक्षांचे नगरसेवक, शहरातील प्रमुख मान्यवर तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी कणकवली शहरवासीयांना निमंत्रित करण्यात आले आहे, असे संदेश पारकर यांनी सांगितले.
नगरपंचायतीच्या सभागृहात शहराच्या विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर लोकशाही पद्धतीने चर्चा, विचारविनिमय आणि संवाद घडत असतो. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात होणाऱ्या चर्चेतून शहराच्या विकासाचे निर्णय घेतले जातात. या लोकशाही परंपरेला अधिक दर्जेदार आणि आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न नव्या सभागृहाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
कणकवली शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हे नूतन सभागृह एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, लोकार्पण सोहळ्यास शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संदेश पारकर, सुशांत नाईक यांनी केले आहे.
