Headlines

आचरा पारवाडी नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामाला सुरुवात…

⚡मालवण ता.१६-:
आचरा–पारवाडी नदीपात्रातील मोठ्या प्रमाणावर साचलेला गाळ काढण्याच्या कामाला आजपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून आणि प्रयत्नांतून हे काम मार्गी लागले असून, आचरा गावचे सरपंच जेरोन फर्नांडिस यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे पंचायत समिती सदस्य गणेश तोंडवळकर आचरा उपसरपंच संतोष मिराशी संतोष कोदे, ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर चंदू कदम श्रुती सावंत, अनुष्का गावकर, पूर्वा तारी, बाबू परुळेकर, अभय भोसले, गुरु कांबळी, उमेश सावंत पारवाडी ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

आचरा–पारवाडी परिसरातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नदीच्या प्रवाहावर तसेच पाणी साठवण क्षमतेवर परिणाम होत होता.

उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि परिसरातील जलसुरक्षेला बळकटी देण्यासाठी नदीपात्रातील गाळ उपसा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने होत होती. या प्रश्नाची दखल घेत आमदार नीलेश राणे यांनी यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत नदीपात्राची प्रत्यक्ष पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामासाठी नाम फाउंडेशनला वर्कऑर्डर देण्यात आल्याची माहिती आमदार राणे यांनी दिली होती. त्यानुसार आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

गाळ उपशामुळे नदीपात्रातील साचलेला गाळ कमी होऊन पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यास आणि नदीपात्राची साठवण क्षमता सुधारण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे. यासोबतच आचरा–पारवाडी नदीवर कच्चा बंधारा उभारण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असून, त्याद्वारे समुद्राकडे वाहून जाणारे गोडे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्याचे नियोजन आहे.
गाळ उपसा आणि कच्च्या बंधाऱ्याची उभारणी या दोन्ही कामांमुळे भविष्यात आचरा–पारवाडी परिसरातील शेती, बागायती तसेच भूजल पातळीच्या दृष्टीने सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला आता गती मिळाली आहे. आगामी काळात गाळ उपशाचे काम नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण होऊन परिसराच्या जलसुरक्षेला मोठा हातभार लागेल, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page