कुडाळ जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये उद्यापासून पाच लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ समाजसेवक निलेश सांबरे यांच्या पुढाकारातून कोकणातील पाचही जिल्ह्यांतील माध्यमिक शाळांसाठी एकूण ३५ लाख वह्यांच्या मोफत वाटपाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
निलेश सांबरे यांच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. कोकणातील पाचही जिल्ह्यांमध्ये मोफत उपचारांची सुविधा देणारी तीन अद्ययावत रुग्णालये, सीबीएसई शाळा, स्पर्धा परीक्षा वाचनालये, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे, संगणक प्रशिक्षण केंद्रे, ४० हून अधिक रुग्णवाहिका तसेच महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण केंद्रे असे विविध उपक्रम संस्थेमार्फत विनामूल्य चालविले जात आहेत.
या वह्या वाटप उपक्रमासाठी जिजाऊ संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. जिजाऊ परिवाराचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते नकुल पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुदर्शन पाटील, वैभव मसणे, ओंकार तिवरेकर, ज्ञानेश्वर निवरेकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते या उपक्रमाच्या नियोजनासाठी कार्यरत आहेत.

