प्रशिक्षण वर्गाला जिल्ह्यासह राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद:२५ नोव्हेम्बर पासून प्रशिक्षण सुरू…

⚡वैभववाडी ता.१७-: महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था, मुंबई संचलित वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शासनमान्य मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सिंधुदुर्गसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ४५ प्रशिक्षणार्थींनी या वर्गासाठी नोंदणी केली आहे.
पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत हा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे.
प्रशिक्षण कालावधीत दररोज दोन तास तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोडीलिपीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश व प्रशिक्षण शुल्क मिळून ३०० रुपये, तर इतरांसाठी ६०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थींची उपस्थिती किमान ८० टक्के असणे आवश्यक असून, त्यानंतर १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत किमान ५० गुण मिळविणाऱ्यांना उत्तीर्ण घोषित करून प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी शाळा अथवा महाविद्यालयाचे ओळखपत्र आणि आधारकार्डची छायांकित प्रत, तर इतरांनी आधारकार्डची छायांकित प्रत व पासपोर्ट आकाराचे दोन फोटो अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, इतिहासप्रेमी, अभ्यासक, शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी तसेच मोडीलिपी शिकण्याची इच्छा असणाऱ्या सर्वांना या प्रशिक्षणात सहभागी होता येणार आहे.
प्रशिक्षण वर्गासाठी जागा मर्यादित असून, इच्छुकांनी येत्या दोन दिवसांत प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. आर. चव्हाण यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी इतिहास विभागप्रमुख प्रा. एस. एन. पाटील (मो. ९८३४९८४४११) यांच्याशी संपर्क साधावा, असे महाविद्यालयातर्फे कळविण्यात आले आहे.
