कुडाळ न प चे भाजप नगरसेवक ऍक्शन मोड वर:जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रर..
⚡कुडाळ ता.१४-: कुडाळ शहरातील वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत नगरपंचायतीने केलेला रस्ता चोरीला गेल्याचा आरोप भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी केला असून या संदर्भात मुख्याधिकारी अरविंद नातू यांची भाजपा नगरसेवकांनी भेट घेतली असता मुख्याधिकारी यांनी रस्ता चोरीला गेला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. दरम्यान या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी सांगितले.
कुडाळ शहरांमध्ये नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतींना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून वाचनालय ते उदय नाडकर्णी घरापर्यंत रस्ता मंजूर झाला होता. या रस्त्यासाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र हा रस्ता त्या ठिकाणी करण्यात आला नसल्याचे उघड झाल्यावर या संदर्भातील कागदपत्रे भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी घेऊन हा रस्ता चोरीला गेल्याचे त्यांनी आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी सांगितले की, या रस्त्यासाठी मंजूर असलेला निधी अन्यत्र खर्च करण्यात आला. या रस्त्याचे बिल एका महिन्याच्या आत ठेकेदाराला अदा करण्यात आले. मात्र गेले दोन-तीन वर्षे काही बिले अदा करण्यात आलेली नाही तर हे बिल एवढे तात्काळ अदा करण्यात का आले आणि ज्या रस्त्यासाठी निधी मंजूर होता त्यासाठी खर्च करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा रस्ता चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान यासंदर्भात मुख्याधिकारी अरविंद नातू यांची भाजपा जिल्हा सरचिटणीस विनायक राणे, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेविका सौ संध्या तेरसे, प्राजक्ता बांदेकर, चांदनी कांबळी, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर, स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांनी भेट घेतली. यावेळी सर्व नगरसेवकांनी सांगितले की, अशा प्रकारचा घोटाळा झाला आहे आणि त्याला प्रशासनाने सहकार्य केले आहे. रस्ता मंजूर आहे वाचनालय ते उदय नाडकर्णी घर, मात्र त्या ठिकाणी हा निधी खर्च करण्यात आलेला नाही. मग हा निधी इतर ठिकाणी का खर्च केला गेला. यासंदर्भात ठराव का बदलले गेले नाही? इतर वेळी एखादा ठराव केलेला असेल आणि त्या ठिकाणी निधी खर्च झाला नसेल तर तो ठराव बदला असे सांगितले जाते. मात्र या प्रकरणात तसे झालेले नाही. त्यामुळे हा निधी लाटण्याचा प्रकार आहे असे सांगितले.
या संदर्भात मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी सांगितले की यामध्ये अभियंता यांनी दिलेल्या अंदाजपत्रकानुसार निधी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता चोरीला गेला ही बाब चुकीची आहे. असे सांगितले दरम्यान भाजपा नगरसेवक निलेश परब यांनी सांगितले की याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी यांना देऊन याची चौकशी करण्यासंदर्भात मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
