सुशांत नाईक, कन्हैया पारकर यांची बोचरी टीका…
⚡कणकवली ता.१३-: माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे यांच्यासह राणे समर्थकांची शहरात पैसे वाटणारे कार्यकर्ते अशी ओळख बनली आहे. सत्ताबदल झाल्यानंतर नलावडे, हर्णे यांची निष्ठा बदलते. शहरात व्यावसायिक राजकारण करून नलावडे व हर्णे हे राजकीय एन्जॉयमेंट करीत आहेत, अशी बोचरी टीका शिवसेना उबाठा गटाच्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व तालुकाप्रमुख कन्हैया पारकर यांनी केली.
विजय भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. नाईक व श्री. पारकर बोलत होते. यावेळी युवासेनेचे तालुकाप्रमुख उत्तम लोके, तालुका समन्वयक तेजस राणे उपस्थित होते.
सुशांत नाईक म्हणाले, राज्यात मविआचे 31 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मविआची सत्ता येणार आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांचा विजय होणार आहे. मविआचे सरकार आल्यानंतर वैभव नाईक हे मंत्री होणार असून ते जिल्ह्याचे पालकमंत्री होतील, असा दावा नाईक यांनी केला. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर नलावडे व हर्णे आपली निष्ठा बदल करतील, असा टोला लगावला.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत भाजपचे उमेदवार नारायण राणे हे निवडून यावेत, म्हणून शहरातील मतदारांना राणे समर्थकांकडून पैशांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे पैसे वाटणारे कार्यकर्ते म्हणून राणे समर्थकांची शहरात ओळख झाली आहे. आगामी निवडणुकांमध्ये राणे समर्थकांनी मतदारांना पैशांचे वाटप न करता सामाजिक कार्याच्या जोरावर निवडणूक लढवून त्या जिंकून दाखवाव्यात, असे आव्हान नाईक यांनी दिले. आमदार वैभव नाईक यांनी आमदारकीचे शेवटचे दोन-चार महिने एन्जॉय करावे, असा सल्ला उपर्या नलावडे व हर्णे यांनी देऊ नये, असे नाईकांनी सुनावले. गेली 35 वर्षे नारायण राणेंनी विविध पदे भूषवली आहेत. या पदांचा वापर त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी केला असता तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राणे समर्थकांना मतदारांना पैसे वाटण्याची वेळ आली नसती. राणेंनी ही निवडणूक धनशक्तीच्या जोरावर जिंकली आहे, असा गंभीर आरोप नाईकांनी केला.
माजी खासदार विनायक राऊत 15 जूनला सिंधुदुर्ग दौर्यावर येणार आहेत. या दौर्यात ते ठिकठिकाणी जाऊन जनतेचे व मतदारांचे आभार मानणार आहेत. राऊत हे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना उबाठा गटाची संघटनात्मक बांधणी करून राणेंच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी शिवसैनिकांना चार्ज करणार आहेत. राऊत हे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर चिंतन करणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार निवडून येण्यासाठी पदाधिकारी व शिवसैनिकांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, असे पारकर यांनी सांगितले. जिथे सत्ता तिथे उडी मारणे आणि सत्तेतून पैसे कमविणे हे नलावडे व हर्णे यांचे धोरण आहे. नलावडे व हर्णे यांनी शहरात व्यावसायिक राजकारण करून स्वतःचा विकास केला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरात राणेंना मते मिळावीत म्हणून पैसे वाटावे लागले, हे नलावडे व हर्णे आणि राणे समर्थकांचे दुर्दैव आहे, अशी टीका पारकर यांनी केली.
