तारकर्ली रस्त्याच्या डागडुजीसाठी छेडलेले उपोषण सा. बां. विभागाच्या आश्वासनानंतर स्थगित…

⚡मालवण ता.०८-: नौदल दिन कार्यक्रमावेळी डांबरीकरण व सुस्थितीत केलेल्या तारकर्ली येथील रस्त्याच्या दुतर्फा जलजीवन मिशनच्या कामासाठी खोदाई करण्यात आल्या आल्यानंतर चार महिने उलटले तरी त्याठिकाणी रस्त्याची दुरुस्ती करण्यात न आल्याने तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी ग्रामस्थांसह तारकर्ली येथील साई मंदिर नजीक सुरु केलेले आमरण उपोषण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आश्वासनानंतर स्थगित केले. या उपोषणास्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मालवणचे अभियंता अजित पाटील यांनी भेट देऊन जलजीवन मिशनचे अधिकारी श्री. मेस्त्री यांना येत्या १५ दिवसात रस्त्याच्या डागडुजीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देत काम पूर्ण होण्याबाबत उपोषणकर्ते श्री. बापर्डेकर यांना आश्वासित केले.

नौदल दिन कार्यक्रमावेळी तारकर्ली रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर सार्वजनिक विभागाच्या परवानगीने तारकर्ली येथील रस्त्याच्या दुतर्फा जलजीवन मिशनच्या कामासाठी खोदाई करण्यात आली. या खोदाईमुळे रस्त्याच्या कडेच्या भागाची दुरावस्था झाली असून यामुळे वाहनांचे अपघात होत आहेत. हा खोदाई केलेला रस्ता पंधरा दिवसात पूर्वीसारखाच सुस्थितीत करण्यात यावा, अशी मागणी तारकर्लीचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश बापर्डेकर यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मात्र रस्त्याच्या डागडुजीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने तारकर्ली येथील साई मंदिर येथे सुरेश बापर्डेकर यांनी ग्रामस्थांसह उपोषण छेडले. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच मृणाली मयेकर, किशोर कुबल, तुळशीदास कोयंडे, जयवंत सावंत, गणपत मोंडकर, प्रसाद बापर्डेकर, कुणाल बापर्डेकर, प्रतीक कुबल, रामा चोपडेकर, सहदेव साळगावकर, प्रकाश बापर्डेकर, दीपक लोणे, वैभव सावंत, गीतेश बापर्डेकर, बाबु टिकम, हर्षल गंभीरराव, वैभव तळवडकर, आदी उपस्थित होते.

या उपोषण स्थळी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे अभियंता अजित पाटील, जलजीवन मिशनचे अधिकारी श्री. मेस्त्री, ठेकेदार सिंगारे यांनी भेट देऊन उपोषण कर्ते श्री. बापर्डेकर यांच्याशी चर्चा केली. यावेळी अभियंता अजित पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली असता खोदाईमुळे रस्त्याच्या बाजूपट्ट्या खराब झाल्याचे तसेच दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त भागात खोदाई झाल्याने रस्त्याचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी अजित पाटील यांनी या रस्त्याची डागडुजी १५ दिवसात करण्याच्या सूचना जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना देऊन जलजीवन मिशन विभागाकडून चुकीच्या पद्धतीने कामा झाल्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल, असे सांगितल्याची माहिती सुरेश बापर्डेकर यांनी दिली. पाटील यांनी रस्त्याचे काम १५ दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने श्री. बापर्डेकर यांनी उपोषण स्थगित केले. मात्र १५ दिवसात रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास पुन्हा उपोषण सुरु करू, असा इशारा श्री. बापर्डेकर यांनी दिला.

You cannot copy content of this page