रविकिरण तोरसकर:किनारपट्टीवर राणे यांना १०,७३६ एवढे मताधिक्य..
मालवण (प्रतिनिधी)
लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विनायक राऊत यांच्यावर ४८००० मतांनी विजय मिळविला. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपचे कमळ फुलवण्यात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे. नारायण राणे यांना सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागात तब्बल १०,७३६ एवढे मताधिक्य मिळाले आहे, अशी माहिती भाजपच्या मच्छिमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या या नेत्रदीपक विजयात सिंधुदुर्गातील मच्छिमार व किनारपट्टी समुदायाने मोठा वाटा उचलला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ कि.मी. च्या किनारपट्टीवर देवगड (नगर पंचायत) व मालवण, वेंगुर्ला अशा दोन नगरपालिका असून ३५ ग्रामपंचायती आहेत. या सर्व ३८ गावामध्ये नारायण राणे यांना मताधिक्य मिळाले आहे. जिल्ह्यातील किनारपट्टीवर १०६ मतदान केंद्रे (बूथ)असून यापैकी ९४ मतदान केंद्रावर नारायण राणे आघाडीवर आहेत. एकंदर मतदानापैकी श्री.नारायण राणे यांना २९,२७५ तर पराभूत उमेदवार विनायक राऊत यांना १८५३९ मते मिळाली आहेत. म्हणजेच महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना सिंधुदुर्ग किनारपट्टी भागात तब्बल १०७३६ एवढे मताधिक्य मिळाले. राणे यांच्या विजयात सिंधुदु्ग किनारपट्टीवर वसलेला मच्छीमार तसेच किनारपट्टीवरील इतर समुदाय यांचा मोठा वाटा आहे. त्याबद्दल सर्व किनारपट्टीवरील मतदारांचे भाजपा मच्छीमार सेल तर्फे आपण आभार मानतो, असे रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
किनारपट्टी भागाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. नारायण राणे यांच्या रूपाने अनुभवी आणि सक्षम खासदार संसदेत गेल्यामुळे किनारपट्टी भागातील समस्या सोडवण्यात मदत होणार आहे. तसेच मत्स्यव्यवसाय, पर्यटन व इतर पूरक व्यवसायासाठी केंद्र सरकारच्या विविध योजना राबविण्यास बळकटी मिळेल अशी आम्हाला आशा आहे, असेही रविकिरण तोरसकर यांनी म्हटले आहे.
