५३ व्या आंतर-महाविद्यालयीन युवा महोत्सवात वराडकर महाविद्यालयाचे घवघवीत यश…

व्हर्च्युअल पद्धतीने झाली प्राथमिक फेरी;अंतिम फेरीत प्रवेश

मालवण (प्रतिनिधी) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ५३ व्या आंतर- महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे आयोजन कोरोना पार्श्वभूमीवर व्हर्चुअल पद्धतीने करण्यात आले असून या युवा महोत्सवाच्या प्राथमिक फेरीत कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय, कट्टाच्या विद्यार्थ्यांनी पोस्टर मेकिंग, कार्टूनिंग, ऑन दि स्पॉट पेंटिंग, भारतीय सुगम संगीत (वैयक्तिक) आदी स्पर्धा प्रकारात उज्ज्वल यश संपादन करून अंतिम फेरीसाठी आपले स्थान निश्चित केले. पोस्टर मेकिंग’ या स्पर्धाप्रकारात “सोशल डीस्टनसिंग” या विषयावर कु. पूजा सुरेश पांचाळ (तृतीय वर्ष वाणिज्य) हिने काढलेल्या पोस्टरला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. तसेच ‘कार्टूनिंग’ या स्पर्धाप्रकारात “लॉकडाऊन” या विषयावर कु. आकाश अशोक बिरमोळे (प्रथम वर्ष कला) याने काढलेल्या व्यंगचित्राला प्रथम क्रमांक मिळाला. ‘ऑन दि स्पॉट पेंटिंग’ या स्पर्धाप्रकारात कु. वेदांत संतोष पोटफोडे (प्रथम वर्ष कला) याने “भारतीय सण” या विषयावर काढलेल्या चित्राने तृतीय क्रमांक पटकावला व भारतीय सुगम संगीत’ (वैयक्तिक) या स्पर्धाप्रकारात कु. ऋद्धी राजकुमार मोरे (तृतीय वर्ष वाणिज्य) हीने गायलेल्या “गंध वाऱ्या थांब दारी” या भावगीताला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कु. सुबोध सुभाष मालंडकर व कु. संकेत वसंत मेस्त्री यांनी सदर गीताला अनुक्रमे तबला व हार्मोनियम साथ दिली. प्राथमिक फेरीतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून अंतिम फेरीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page