ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांचा पुढाकार: बंधाऱ्याची साफसफाई देखील केली..
बांदा/प्रतिनिधी
बांद्यात निमजगा येथे लोकसहभागातून बंधाऱ्याचे बांध उघडण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांच्या पुढाकाराने एकत्र येत बंधाऱ्याची साफसफाई देखील केली.
येथील निमजगा येथे मागील वर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व हेमंत दाभोलकर यांनी मागणी व पाठपुरावा करत लघुपाटबंधारे विभागाकडून येथील बंधाऱ्यावर लोखंडी प्लेटचा बांध घालून घेतला होता. ज्यामुळे पाण्याची साठवणुक होऊन निमजगा, गवळीटेंब, शेटकरवाडी, गणेश नगर या सर्व भागातील विहीरींमधील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली होती. तसेच या वाड्यांमधील सार्वजनिक नळधारकांना मागील वर्षभर पाणीपुरवठ्याची मुबलक सोय करण्यात आली. ज्यामुळे मागील संपूर्ण वर्षभर या परिसरात पाण्याचा तुटवडा भासला नाही.
पावसाळा जवळ आल्याने सदर लोखंडी प्लेट वेळेत काढणे महत्वाचे होते. अन्यथा येथील शेत जमिनींचे नुकसान झाले असते. त्यामुळे याची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा येथील ग्रामस्थांनी सामाजिक जबाबदारी ओळखत लोकसहभागातून या लोखंडी प्लेट काढुन, बंधाऱ्यात साठलेला कचरा, गाळ काढत परिसराची स्वच्छता देखील केली. त्यामुळे या तिन्ही वाड्यातील लोकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, हेमंत दाभोलकर, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी मोहन सावंत, अजय आईर, अवधुत मेस्त्री यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
