गोदामातील टोका सदृश्य कीटकाचे धान्य सोमवार पर्यंत हलवा…

अन्यथा पूर्व सूचना न देता आत्मदहन: नेरूर गोंधयाळेवाडीतील ग्रामस्थांचा इशारा..

⚡कुडाळ ता.०७-: नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थांना होत असलेल्या टोका सदृश्य कीटकाच्या त्रासाबाबत आज वखार महामंडळाच्या विभागीय अधिकारी तृप्ती कोळेकर यांनी कुडाळ एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदमाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. दोन महिने होऊन देखील गोदाम प्रशासनाकडून हवीतशी काहीच कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले. गोदमातील अतिरिक्त धान्यसाठा सोमवार पर्यंत उचलला नाहीतर मंगळवार पासून कधीही पूर्वसूचना न देता गोदामासमोर आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.

नेरूर-गोंधयाळे येथील ग्रामस्थांना गेले दोन महिने होत असलेल्या टोका सदृश्य किड्यांच्या त्रासाबाबत ग्रामस्थांनी दोन दिवसांपूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी वरिष्ठ अधिकारी ७ जून रोजी गोदामाला भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करतील अशी ग्वाही साठा अधीक्षक समृद्धी नांदगावकर यांनी ग्रामस्थांना दिली होती. त्याप्रमाणे विभागीय अधिकारी तृप्ती कोळेकर या आज सायंकाळी ४ वाजता एमआयडीसी येथील वखार महामंडळाच्या गोदाम कार्यालयात आल्या. त्यांची नेरूर-गोंधयाळेवाडी ग्रामस्थांनी भेट घेतली. यावेळी श्रीमती कोळेकर याना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गोदामात अतिरिक्त साठा झाल्यामुळे बरेच दिवस या ग्रामस्थांना त्या कीटकांचा त्रास सहन करावा लागतोय आणि वरिष्ठ अधिकारी आज येथे भेट देत आहेत यावरून श्रीमती कोळेकर याना ग्रामस्थांनी धारेवर धरले.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर हे देखील गोदाम कार्यालयात दाखल झाले. त्यांनी श्रीमती कोळेकर आणि समृद्धी नांदगावकर यांच्याशी चर्चा केली. लोकांना होत असलेल्या त्रासाबद्दल कल्पना दिली. तुम्ही ठेकदारांचे हित जपताय, त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त धान्य भरत आहात असा आरोप देखील उपरकर यांनी केला. हा एकच वाहतूक ठेकेदार गेली वीस वर्ष येथे काम करत असून या ठेकेदाराने वखार महामंडळाच्या अधिकाऱ्याना घरे बांधून आणि फ्लॅट घेऊन दिले असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. त्यावर ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले.
जिल्हाधिकारी म्हणतात जिल्ह्याला २५० मेट्रिक टन धान्याची गरज आहे. असे असताना तुम्ही ९०० मेट्रिक टन धान्यसाठा कसा काय करून ठेवलात ? असा सवाल श्री. उपरकर यांनी अधिकाऱ्यांना विचारला. अतिरिक्त साठ्यामुळे या कीटकांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हा अतिरिक्त साठा त्वरित हलवा अशा सूचना श्री. उपरकर यांनी केल्या. पण गोदाम उपलब्ध नसल्याने साठा ठेवायचा कुठे असा प्रश्न गोदाम अधिकऱ्यानी उपस्थित केला. त्यावर एमआयडीसी उप अभियंता श्री. रेवणकर याना श्री. उपरकर यांनी फोन लावून कुठे बंद असलेल्या कंपनाया असतील तर अशा कंपनीत हा साठा उतरवून ठेवण्याची सूचना त्यांनी केली. श्रीमती कोळेकर सुद्धा याबाबत श्री. रेवणकर यांच्याशी बोलल्या.
दरम्यान हे गोदाम कधी स्वच्छ केले जाते हा प्रश्न देखील उपस्थित झाला. त्यावेळी साठा अधीक्षक श्रीमती नांदगावकर य आणि ६ कर्मचारी यासाठी असल्याचे सांगून त्या कर्मचाऱ्यांना गर्मठांसमोर हजर केले. ग्रामस्थांनी त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती केली.
दरम्यान धान्य साठा हलविण्यासाठी येत्या सोमवार पर्यंत वखार महामंडळाला डेड लाईन देण्यात आली आहे. तो पर्यंत साठा उचलला नाही तर मात्र कोणतीही पूर्वसूचना न दत्त आत्मदहन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
यावेळी नेरूर सरपंच भक्ती घाडीगावकर, माजी सरपंच शेखर गावडे, बाबल गावडे, राजेश टंगसाळी, मंगेश राऊत, अजित मार्गी, महेश राणे, विजय गावकर, कृष्णा मार्गी, शिल्पा गावडे, लक्ष्मण लोके, चिदानंद कोरगावकर, वसंत गावडे, रामचंद्र कांबळी, गौरी गवाणकर, दिशा गवाणकर,शारदा गावडे, चंद्रकांत गावडे, लक्ष्मण महाजन, दिनेश करीलगेकर, नेहा गावडे, हार्दिक गावडे, परशुराम करीलगेकर, संतोष धुरी, प्रभाकर गावडे, प्रांजल गावडे, रुचिदा कोरगावकर, प्रल्हाद जावकर सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page