मालवण शासकीय तंत्रनिकेतनच्या ६२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड…

⚡मालवण ता.०६-: मालवण येथील शासकीय तंत्रनिकेतन मधील २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखती द्वारे विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी दिली आहे.

पुणे येथील वाहन उद्योगातील अग्रगण्य बजाज ऑटो कंपनीने मालवण शासकीय तंत्रनिकेतन मधील इलेक्ट्रिकलच्या २ तर इलेक्ट्रोनिक्सच्या ११ विद्यार्थ्याची निवड केली. जॉन डीअर या कंपनी मध्ये इलेक्ट्रोनिक्सच्या १ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. टाटा मोटर्स मध्ये इलेक्ट्रिकलच्या २, इलेक्ट्रोनिक्सच्या ४ विद्यार्थ्याची निवड झाली आहे. जीई एविएशन पुणे या कंपनीत इलेक्ट्रिकलच्या ५ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच लक्ष्मी कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर मध्ये सिव्हीलच्या ११ विद्यार्थ्यांची निवड झाली. हिकव्हिजन कंपनी कडून इलेक्ट्रिकलच्या ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कमिंस इंडिया लिमिटेड मध्ये इलेक्ट्रिकलच्या ३, इलेक्ट्रोनिक्सच्या १० विद्यार्थ्याची निवड झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजमध्ये मेकॅनिकलच्या ३ तर गॅब्रीअल पुणे येथे इलेक्ट्रोनिक्सच्या ६ विद्यार्थ्यांची निवड झाली तसेच जीई एरोस्पेस पुणे या कंपनीत मेकॅनिकलच्या ९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. सद्यस्थितीमध्ये विविध नामवंत कंपन्या फिलिप्स हेल्थकेअर पुणे, लार्सन & टुब्रो मुंबई, फ्लश इलेक्ट्रोनिक्स, KSPG ऑटो, या कंपन्यानी ऑनलाइन पद्धतीने नियुक्तीसाठी भाग नोंदलेला आहे.

संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षणाकडे कल वाढत असून विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. संस्थेच्या या कामगिरीसाठी तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनाचा मोलाचा वाटा राहिला आहे, असे प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले.

या निवडीसाठी संस्थेचे प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाखतीद्वारे निवडीसाठी इलेक्ट्रोनिक्स विभाग प्रमुख तथा प्रशिक्षण व अस्थापना अधिकारी डॉ. संजय चोपडे यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच इतर सर्व शाखांचे विभाग प्रमुख व विभागातील प्लेसमेंट अधिकारी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी अथक प्रयत्न करत आहेत.

You cannot copy content of this page