धोंडी चिंदरकर:राणे यांच्या विजयाने मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचे..
⚡मालवण ता.०६-:
लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयात मालवण तालुक्याने ११,६२६ एवढे मताधिक्य दिले आहे. या मताधिक्याने आपण समाधानी असून राणे यांना मिळालेले मताधिक्य ही आम. वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी राणे यांच्या विजयानंतर दिली.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झाल्यावर भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रतिक्रिया दिली.
चिंदरकर म्हणाले, राणे यांना मालवण तालुक्यातून ११,६२६ एवढे मताधिक्य मिळाले. तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद मतदार संघ तसेच बहुतांश गावातून राणे यांना मताधिक्य मिळाले. मात्र हाताच्या बोटावर मोजता येईल एव्हढ्या मोजक्याच मतदान केंद्रावर मताधिक्य राणे यांना मिळाले नाही. मात्र मालवण तालुक्याने नारायणराव राणे यांना मताधिक्य देताना जो विजयात मोलाचा वाटा उचलला आहे त्याबद्दल आपण समाधानी आहोत. राणे यांना मालवणसह कुडाळमधून मिळालेले मताधिक्य म्हणजे विधानसभासभा निवडणुकीसाठी आमदार वैभव नाईक यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे, आताचे मताधिक्य पाहता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्हाला नवी उर्मी मिळाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मालवण कुडाळ मतदार संघात अधिकचे काम आम्ही करू, असेही चिंदरकर म्हणाले.
तसेच लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. राणे यांच्या विजयाने मिळालेले यश हे कार्यकर्त्यांचे आहे. तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मोठी मेहनत घेतली, या निवडणुकीसाठी ना. रवींद्र चव्हाण हेच किंगमेकर ठरले आहेत, असेही धोंडी चिंदरकर म्हणाले.
