⚡मालवण ता.२३-:
चौके येथील भ. ता. चव्हाण माध्यमिक विद्यालयात दि. २४ आणि २५ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ४.३० या वेळेत खेळ मातीतील या मोफत शिबिराचे आयोजन केले आहे.
आधुनिक काळात स्पर्धेच्या युगात करिअरच्या मागे धावत असताना पूर्वीचे पारंपरिक खेळ कुठेतरी मागे पडल्याचे चित्र ग्रामीण भागात सर्रास दिसत आहे. मोबाईलच्या अतिवापराचे परिणाम आजच्या पिढीवर जाणवू लागले आहेत. त्यामुळे नवीन पिढीला जुन्या खेळांची ओळख व्हावी व त्यांचे जतन व्हावे म्हणून चौके पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी ‘खेळ मातीतील’ या शिबिराचे आयोजन चौके हायस्कूल येथे करण्यात आले आहे. यात लंगडी, लगोरी, विटी-दांडू, गोट्या, रस्सीखेच, खापरी, दोरीउड्या, लिंबू-चमचा, धावणे, तळ्यात मळ्यात, टायर चालविणे, रिंग गाडा तसेच आईचा रुमाल हरवला, कॅरम, ल्युडो, सापशिडी, बुद्धिबळ इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. चित्रकला, योगासने तसेच निसर्गावर आधारित माहितीही विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. दोन्हीही दिवस विद्यार्थ्यांचे अल्पोपहार तसेच जेवणाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात आली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील वयोगट ८ ते १४ मधील सर्व विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ-मुंबई, स्थानिक कमिटीचे अध्यक्ष बिजेंद्र गावडे तसेच मुख्याध्यापिका रसिका गोसावी यांनी केले आहे
