राणेंनी मुलांना जर्मनीत पाठवावे…

आमदार वैभव नाईक यांचा टोला ः
रोजगार मेळाव्यातून किती जणांना रोजगार मिळाला..?

⚡कणकवली ता.२३-: निवडणुका आल्यावर केंद्रीयमंत्री नारायण राणे हे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देणार अशी आश्‍वासने देत असतात. जिल्ह्यातील 10,000 बेरोजगारांना जर्मनीत रोजगार मिळेल, असे राणे आता सांगत आहेत. मात्र, राणेंनी आपल्या दोन मुलांना रोजगारासाठी जर्मनीत पाठवावे, तसे झाल्यास जिल्ह्यात शांतता निर्माण होईल आणि राणेंना मनशांती मिळेल, असा टोला आमदार वैभव नाईक यांनी विजयभवन येथे पत्रकारांशी बोलताना राणेंना लगावला.


निवडणुका आल्यावर नारायण राणे लोकांना रोजगार देतो, अशी आश्‍वासने देतात. गेली 35 वर्षे राणे हे रोजगार देण्याची भाषा करीत आहेत. प्रत्येक निवडणुकीत राणे हे जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी विविध उपक्रम राबवित आले आहेत. नारायण राणे हे वागदे येथे कौशल्यविकास केंद्र उभारणार होते. केंद्र उभारणीचा शुभारंभ त्यांनी केला होता. अद्यापही याठिकाणी कौशल्यविकास केंद्र उभे राहू शकले नाही, ही वस्तूस्थिती आहे. आता त्याठिकाणी केंद्र उभारणीची पाटी देखील नाही आहे. लघु, सुक्ष्म, मध्यम खात्याचे मंत्री असलेले नारायण राणे यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी कौशल्य विकास केंद्रे उभारणीचे जाहीर केले आहे. या केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळेल, असे राणे सांगत आहेत. या खात्याचे पहिले लाभार्थी स्वतः राणे आहेत, असा टोला नाईकांनी लगावला. नीलेश राणे व नीतेश राणे यांनी जिल्ह्यात रोजगार मेळावे घेतले. या मेळाव्यातून अनेकांना त्यांनी रोजगार नियुक्तीपत्रे दिली. प्रत्यक्षात बेरोजगारांना दोन महिने ही रोजगार मिळला नाही. ही वस्तूस्थिती जिल्ह्यातील युवकांना माहित आहेत, असे नाईक यांनी सांगितले.

You cannot copy content of this page