शहरातून राऊतांना लीड देण्याचे आव्हान नाईक बंधूंनी स्वीकारावे…

सुशांत नाईकांच्या आरोपांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे प्रत्युत्तर: नाईकांच्या प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर देणार..

⚡कणकवली ता.२१-: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यावर बोलण्याची सुशांत नाईक यांची पात्रता नाही. नाईक हे केवळ प्रसिद्धीसाठी बडबडत आहेत. आम्ही राणेंना शहरातून लीड देणार आहोत, हिम्मत असेल तर विनायक राऊतांना शहरातून लीड देण्याचे आव्हान आमदार वैभव नाईक व सुशांत नाईक यांनी स्वीकारावे, असे प्रत्युत्तर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सुशांत नाईक यांना दिले.
राणे यांच्यावर नाईक बंधूंनी आता यापुढे आरोप केले तर त्यांच्या प्रत्येक आरोपाला आम्ही प्रत्युत्तर देणार आहोत.
वैभव नाईक व सुशांत नाईक, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर हे कणकवली शहरात तर सतीश सावंत हे कणकवली शहरा लगत राहतात. त्यांच्यामध्ये जर हिम्मत असेल त्यांनी शहरातून राऊतांना लीड मिळवून द्यावे. आम्ही जर राणेंना लीड मिळवून दिले तर नाईक बंधूंनी राजकीय संन्यास घ्यावा. शहरातून राणेंना लीड न मिळाल्यास मी राजकीय संन्यास घेईन, असे आव्हान नलावडे यांनी नाईकांना दिले.
तेराव्या यादीमध्ये राणे यांची उमेदवारी जाहीर झाली अशी टीका करणाऱ्या सुशांत नाईक यांनी लक्षात ठेवावे की येत्या 4 जूनला राऊतांचे राजकीय अस्तित्व आम्ही संपवणार आहोत. मतदानाच्या माध्यमातून आम्ही या तेराव्या यादीचे उत्तर तेराव्यातून देऊ, असा टोला नलावडे यांनी लगावला. नाईक ज्या शहरात राहतात त्या शहातून त्यांना मते देखील मिळत नाहीत. त्यामुळे सुशांत नाईकांनी बालिश बडबड करू नये. त्यांचे शहरात कोणी ऐकत नाही ते फक्त राजकीय स्वार्थासाठी स्टंटबाजी करतात, असा टोला नलावडे यांनी लगावला. वैभव नाईक यांना खासदार विनायक राऊत हे उमेदवार म्हणून नकोच होते. त्यामुळेच ते एवढे दिवस गप्प होते. किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी वैभव नाईक हे प्रयत्नशील होते. मात्र, त्यांचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर वैभव नाईक यांनी राणेंवर टीका करण्यास सुरूवात केल्याचा गौप्यस्फोट नलावडे यांनी केला.

You cannot copy content of this page