⚡कणकवली ता.१८-: स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कासार्डे दक्षिण गावठाण येथे छापा टाकून महाराष्ट्र प्रतिबंधित असलेला ४६ हजार ८० किमतीचा गुटखा व पानमसाला जप्त केला. ही कारवाई गुरुवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास केली. गुटखा व पानमसाला बाळल्याप्रकरणी आदिनाथ महावीर कऱ्हाडे (३०, रा.कासार्ड-दक्षिण गावठण) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला कासार्ड परिसरात गुटखा व पानमसाल्याचा साठा करून ठेवण्यात आला आहे, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे पथक पेट्रोलिंग करीत असताना कासार्ड-दक्षिण गावठण येथे पोहोचले. त्यानंतर आदिनाथ कऱ्हाडे याच्या घरी हे पथक दाखल झाले. घराबाजूला असलेल्या एका खोपड्यात काय आहे, अशी विचारणा पथकाने आदिनाथ याच्याकडे केली. मात्र, त्याने याबाबत उत्तर देण्यास टाळले. पथकाला संशय आल्याने खोपड्यात पाहणी केली असता त्याठिकाणी गुटखा व पानमसाल्याची पिशव्यांमध्ये भरलेली पाकिटे आढळून आली. पथकाने पाकीटे जप्त केली.
ही कारवाई एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, पोलीस हवालदार राजेंद्र उर्फ राजू जामसांडेकर, जी. बी. कोयंडे, डी. पी. डिसोजा यांनी केली. याप्रकरणी राजेंद्र जामसांडेकर यांनी कणकवली पोलिसांत फिर्याद दिली आहे.
कासार्डे येथे 46 हजारांचा गुटखा जप्त…
