Headlines

कुडाळवासीयांना दिलासा! कचरा उचल पुन्हा सुरू…

उत्कर्ष नगरातील जागेला दोन महिन्यांची मुदतवाढ:नारायण राऊळ यांची जागा वापरण्यास परवानगी..

⚡कुडाळ ता.०८-: गेले दोन दिवस कुडाळवासीयांना भेडसावणारा कचरा प्रश्नावर तात्पुरत्या स्वरूपात तोडगा निघाला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत उत्कर्ष नगर येथील सुरू असलेल्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी वापरण्यात येणाऱ्या जागेला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. जागामालक नारायण वसंत राऊळ यांनी नगरपंचायतीला ही परवानगी दिली आहे. बुधवारी त्यानी तसे पत्र नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांना दिले. त्यामुळे गेले दोन दिवस बंद असलेल्या घंटागाड्या आजपासून पुन्हा कचरा उचलू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
सांगीर्डेवाडी येथील कचरा डेपोला नागरिकांनी विरोध केल्यामुळे कुडाळ शहरातील कचरा व्यवस्थपनाचा प्रश्न गंभीर झाला होता. दोन दिवस शहरातील कचरा उचलण्यात आला नव्हता.
दरम्यान कुडाळ नगरपंचायतीने एमआयडीसी येथील मुख्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत पर्यायी व तात्पुरती व्यवस्था म्हणून उत्कर्ष नगर येथील घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी राऊळ यांच्या मालकीच्या जागेचा वापर करण्यास मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानुषंगाने नगरपंचायतीच्या पत्राचा तसेच सार्वजनिक आरोग्याचा विचार करून राऊळ यांनी सदर जागा आणखी दोन महिन्यांसाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. तसे पत्र त्यांनी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या कडे दिले. यावेळी मुख्याधिकारी खंडू पोवळ, नगरसेविका नयना मांजरेकर, प्रसाद कुंटे आदी उपस्थित होते.
दि. ७ ऑक्टोबर २०२६ पासून पुढील दोन महिन्यांसाठी कुडाळ नगरपंचायतीला या जागेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी वापर करता येणार आहे. या काळात ओला व सुका कचरा वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच तात्पुरत्या स्वरूपात कचरा साठविण्याची व्यवस्था करता येणार आहे.
एमआयडीसी येथील मुख्य घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू होईपर्यंत ही तात्पुरती व्यवस्था नगरपंचायतीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

You cannot copy content of this page