Headlines

आमदार केसरकरांना एवढा विरोध असताना 2024 मध्ये एवढी मतं कशी पडली…?

डॉ. जयेंद्र परुळेकर यांचा सवाल: आम्हाला त्यांच्या मतांवर संशय, चौकशी करा; तर उद्योगमंत्री व पालकमंत्री मोठमोठ्या घोषणा करून थकले..

⚡सावंतवाडी, ता.०८-: २०२४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार दीपक केसरकर यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विरोधाचे वातावरण होते. असे असतानाही ते एकतर्फी विजयी झाले. त्यामुळे त्यांच्या मतांबाबत संशय असून, या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी जोरदार मागणी ठाकरे शिवसेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली.
दरम्यान २०२४च्या विधानसभा निवडणुकीतील मतांची बेरीज पाहता तिन्ही उमेदवारांची मते एकत्र केली तरी दीपक केसरकरांच्या मतांशी ती बेरीज जुळत नाही, असा दावा करत केसरकरांना नेमका कोणाचा आशीर्वाद होता,..? असा सवालही डॉ. परुळेकर यांनी उपस्थित केला.

ते पुढे बोलताना म्हणाले, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दादा भुसे अचानक सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर शाळांची पाहणी करण्यासाठी कसे आले? त्यांचा दौरा खरोखरच शाळांच्या पाहणीसाठी होता की जमीन व्यवहारासाठी, याबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला.तसेच उद्योगमंत्री देखील आडाळीत उद्योग आणण्यासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या मात्र ते देखील अपयशी ठरलेत आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री रोजगाराच्या बाबतीत अपयशी ठरले असून, केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यात व्यस्त आहेत. प्रत्यक्षात विकासकामे आणि रोजगारनिर्मितीच्या बाबतीत ठोस काम झालेले दिसत नाही, असा आरोपही डॉ. परुळेकर यांनी केला. मोठ्या लोकांना जमिनी मिळवून देणे हेच त्यांचे ध्येय असल्याचा टोलाही त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना लगावला.

देशभरात निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलने होत आहेत. मात्र, भाजप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप डॉ. परुळेकर यांनी केला. आता जनता रस्त्यावर उतरली असून, लवकरच भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, अशी टीकाही त्यांनी केली.

You cannot copy content of this page