बबन साळगावकर:बेधडक, बिनधास्त व्यक्तिमत्त्वाचा मित्र-कलाकार गमावल्याचे दुःख..

⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्रातील एका गरीब कुटुंबातून पुढे येत आपल्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण देशात नावलौकिक मिळविणारे ज्येष्ठ अभिनेते नाना यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. नाना हे बेधडक, बिनधास्त आणि मनमोकळे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक मित्र आणि कलाकार गमावल्याचे दुःख आहे, अशा भावना सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केल्या.
नानांनी आपल्या कलेच्या माध्यमातून मोठी लोकप्रियता मिळविलीच; मात्र सामाजिक बांधिलकी जपत केलेले कार्यही उल्लेखनीय आहे. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी उभारलेले काम महाराष्ट्राच्या कायम स्मरणात राहील. अनेक गरजू कुटुंबांना त्यांनी आधार दिला, तर शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या भवितव्यासाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले.
सावंतवाडीतील पर्यटन महोत्सवाशीही नानांचे विशेष नाते होते. या महोत्सवाला त्यांची आवर्जून उपस्थिती असायची. सावंतवाडीकरांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके झाले होते.
नानांच्या निधनाने केवळ मनोरंजन क्षेत्राचे नव्हे, तर सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची आणि कलाविश्वातील योगदानाची आठवण कायम महाराष्ट्राच्या मनात राहील, असेही बबन साळगावकर यांनी सांगितले.
