पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे:सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न..
⚡मालवण ता.१८-: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी एकत्र येत आयोजित केलेला स्नेहमेळावा हा स्तुत्य उपक्रम आहे. स्नेहमेळाव्यातून एकमेकांची सुख दुःख जाणून घेता येतात. एकमेकांशी प्रेमाचे, आपुलकीचे संवाद होतात. भूतकाळातील आठवणींना उजाळा मिळतो. या स्नेहमेळाव्यातून सेवानिवृत्त शिक्षकांचे एकमेकांबद्दलचे प्रेम, आदर, आपुलकी वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांनी येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन शाखा मालवणच्या वतीने नुकताच जिल्हा परिषद शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षक , पदवीधर शिक्षक , केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी यांचा स्नेहमेळावा कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालयात संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर असोसिशनचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर , जिल्हा सरचिटणीस सुंदर पारकर, जिल्हा सदस्य कृष्णा पाताडे, मालवण तालुकाध्यक्ष विजय चौकेकर, तालुका सचिव आनंद धुत्रे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी भालचंद्र चव्हाण, कोमसापचे तालुकाध्यक्ष सुरेश ठाकूर, देवगड तालुकाध्यक्ष मधुकर राणे, ज्येष्ठ शिक्षिका प्रभा केळूसकर, ज्येष्ठ शिक्षक व लेखक मधुकर राणे, कुडाळ तालुका सचिव मनोहर सरमळकर, कल्याण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याच्या प्रारंभी ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हि साने गुरुजींची प्रार्थना मनाली फाटक आणि त्यांच्या सहकारी शिक्षकांनी सादर केली. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती निमित्त त्यांना अभिवादन म्हणून त्यांनी लिहिलेल्या संविधानातील प्रास्ताविक सुगंधा गुरव यांनी उपस्थित सर्वांकडून म्हणून घेतले. कार्यक्रमाचे उदघाटन पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी जानेवारी २०२२ ते मार्च २०२४ अखेर सेवानिवृत्त झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांचा शाल, श्रीफळ गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तर मार्च २०२४ पर्यंत ७५ वर्ष पूर्ण केलेल्या व त्यावरील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त शिक्षकांमधून अरुण गोसावी, शोभा पालव, अनुपमा पालव, दत्तात्रय गांवकर, विभावरी मुंडले, कृष्णा पाताडे, वसंत चव्हाण, सदाशिव गावडे आदींनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रविण कोल्हे यांनी ज्येष्ठांना कायदेविषयक मार्गदर्शन करताना ज्येष्ठांचे हक्क कोणते आहे ? मुले जर आपले पालन पोषण करण्यास असमर्थता दाखवित असतील तर त्यावर कायद्याने कोणाकडे न्याय मिळवू शकता या विषयी सविस्तर माहिती दिली. जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी संघटनेची ध्येय धोरणे आणि जिल्हा कार्यकारीणी सेवानिवृत्त शिक्षकांसाठी जिल्हा पातळीवर कोणत्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी संवाद साधून न्याय मिळवून देते, याबाबत माहिती दिली. ‘अक्षरांचा आनंद’ या विषयावर ज्येष्ठांसाठी प्रबोधनात्मक मार्गदर्शन करताना कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी जिल्ह्यातील शिक्षकांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांची ओळख करून देताना स्वतःचे अनुभव लिहायला शिका, त्याचा फायदा इतरांना होऊ शकतो, असे सांगत अक्षरांतून जीवनात कसा आनंद मिळवाल याबाबत प्रबोधन केले.
यावेळी तालुकाअध्यक्ष विजय चौकेकर यांनी सेवानिवृती नंतर शिक्षक खरेच आनंदी असतो का? आनंदी जीवनासाठी काय करावे याची माहिती देऊन शिक्षकांनी जी जबाबदारी माझ्या वर सोपविली आहे त्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करीन आणि शिक्षकांच्या प्रश्नांचा शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत राहून तुमचे सर्वांचे प्रश्न सोडविण्यासाठी करिबद्ध राहीन, असे सांगितले .
यावेळी मान्यवरांमधून भालचंद्र चव्हाण, मनोहर सरमळकर, मधुकर राणे, प्रभा केळूसकर, लेखक मधुकर राणे आदींनी उपस्थितांना संबोधित केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद धुत्रे यांनी, सूत्रसंचालन सुगंधा गुरव यांनी तर आभार प्रदर्शन रुपाली पेंडूरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मिनल सारंग, श्रृती गोगटे, ज्ञानदेव ढोलम, रामचंद्र वाळके, नरेश पालव, विशाखा तारी, अरुण गोसावी आदींनी मेहनत घेतली.
