राणेंना अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणणार…

प्रभाकर सावंत यांची माहिती ः महायुतीच्या नेत्यांचे मानले आभार..

⚡कणकवली ता.१८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 44 वर्षांनंतर महायुतीच्या नेत्यांनी भाजपला कमळ या चिन्हावर निवडणूक लढण्याची संधी दिली आहे. याबाबत नेत्यांचे मी आभार मानतो. या मतदारसंघातून राणेंना अडीच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणणार, असा विश्‍वास भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कणकवली येथील महायुतीच्या प्राचार कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.


यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री उपस्थित होते.
सावंत म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे आजचा दिवस भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी आनंददायी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांच्या शुभेच्छा भाजपच्या पाठिशी होत्या. या मतदारसंघातून कमळ चिन्हावर महायुतीच्या उमेदवाराने निवडणूक लढवावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची असलेली मनोकामना पूर्ण झाली आहे. महायुतीचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 44 वर्षांना या मतदारसंघातून भाजपला कमळ चिन्हावर ही निवडणूक लढविण्याची संधी दिली. मागील काही दिवस या मतदारसंघातील उमेदवारीचा गुंता कायम होता. मात्र, मंत्री दीपक केसकर, उदय सामंत यांनी सामंजस्याची भूमिका दाखवली. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मागील लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये सेना-भाजपची युती असल्याने या मतदारसंघातून विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून आले होते, त्याचा त्यांना विसर पडला आहे, अशी टीका त्यांनी केली.

You cannot copy content of this page