आमदार वैभव नाईक यांची टीका ः विनायक राऊत विजयी होणार…
⚡कणकवली ता.१८-: भाजपच्या उमेदवारी याद्यांमधील 13 व्या उमेदवारी यादीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे राणे यांची भाजप व महायुतीमध्ये पात्रता काय आहे, हे जनतेने ओळखले आहे. किरण सामंत यांनी उमेदवारी मिळवतानाच राणेंच्या नाकीनऊ आणले, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे विजयी होतील, असा दावा श्री. नाईकांनी पत्रकारांशी बोलताना केला. यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर उपस्थित होते.
राणेंनी हट्टाने उमेदवारी घेतली आहे. त्यांच्या दोन मुलांच्या राजकीय करिअरसाठी राणेंनी उमेदवारी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे हे त्यांचे दोन पुत्र यांच्या राजकीय करिअरसाठी राजकारण करीत आहेत, हे आता सिद्ध झाले आहे. किरण सामंत यांना उमेदवारी दिली असता तर राणेंना सहानभूती मिळाली असती. मात्र, राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी उमेदवारी घेतली आहे. त्यातून राणेंची राजकीय मक्तेदारी दिसून आली आहे. याचा मतदार निश्चितपणे विचार करतील, त्यामुळे राणेंचा पराभव निश्चित आहे, असा दावा श्री. नाईकांनी केला.
