कणकवलीत राम नवमी उत्साहातराम जन्मोत्सव पाहण्यासाठी भक्तांची गर्दी…

आमदार नीतेश राणेंनी घेतले श्री रामाचे दर्शन..

⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यात ठिकठिकाणी राम नवमी उत्सव भक्तीमय वातावरणात व मोठ्या उत्साहात साजरा केला. या उत्सवामुळे सर्वत्र राममय वातावरण होते. मंदिरांमधील राम जन्मोत्सव सोहळा भक्तांनी ‘याची डोळा, याची देही’ पाहिला. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.


तालुक्यातील हळवल, कलमठ, वरवडे यासह अन्य गावांमध्ये राम नवमी उत्सव साजरा करण्यात आला. राम नवमीनिमित्त शहरातील श्री देव काशिविश्‍वश्‍वेर मंदिरात गेले काही दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. मंदिरात बुधवारी सकाळी श्रींची पूजा, अभिषेक हे विधी पार पडले. श्री राम जन्मोत्सवावर कीर्तन पार पडले. त्यानंतर श्री राम जन्मोत्सव सोहळा पार पडला. राम जन्मला सखे राम जन्मला यासह अन्य अशी अंगाई गिते म्हटली. जन्मोत्सव सोहळा पाहण्यासाठी भक्तांनी गर्दी झाली होती. यावेळी गावपुरुष, मानकरी, देवस्थान व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
जन्मोत्सव सोहळ्यानंतर भजनी कलाकरांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळच्या सत्रात लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तृत कलेश्‍वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा महापौराणिक प्रयोग सादर झाला. हा प्रयोग पाहण्यासाठी नाट्यप्रेमी उपस्थित होते. रात्री दैनंदिन आरती पार पडली, त्यानंतर मंदिर परिसरात श्रींची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यात भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हळवल येथील राम मंदिरात श्री रामाचे दर्शन आमदार नीतेश राणे यांनी घेतले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कळसुली सरपंच सचिन पारधिये, शशिकांत राणे, माजी सरपंच संतोष गुरव, प्रदीप गावडे, जिल्हा बँकेचे संचालक समीर सावंत, समीर प्रभूगावकर, समर्थ राणे, श्याम दळवी, प्रभाकर राणे आदी उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक ज्ञानदेव राणे यांनी आमदार नीतेश राणे यांचा सत्कार केला.
शहरातील श्री देव काशिविश्‍वेश्‍वर मंदिर, प. पू. चित्स्वरुप फलाहारी महाराज रघुपतीधाम आश्रमात, हनुमान मंदिरासह तालुक्यात ठिकठिकाणी राम जन्मोत्सव पार पडला.

You cannot copy content of this page