वामन खोत:भंडारी प्राथमिक शाळेत संस्कार शिबिराचे उदघाटन.
⚡मालवण ता.१६-: संस्कार ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. संस्कार शिबिराद्वारे आम्ही विद्यार्थी व पालक यांना दिशा देण्याचे काम करत आहोत. पालकांनी त्यांच्या मुलांवर सातत्याने संस्काराचे धडे देण्याचे व त्यांच्या मनावर चांगल्या विचारांची, कृतीची मशागत करण्याची जबाबदारीची भूमिका निभवावी तरच मुले संस्कारक्षम होतील, असे प्रतिपादन भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत यांनी केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. प्राथमिक शाळेतर्फे इयत्ता १ ली ते ४ थी च्या वर्गांसाठी पाच दिवसीय संस्कार शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथ कवटकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, तसेच भंडारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी, भंडारी ए. सो. हायस्कुलचे मुख्याध्यापक एच. बी. तिवले, शिक्षक सौ. राधा दिघे, सौ. पूर्वी गोवेकर, श्रीमती मानसी परुळेकर, श्रीमती वालावलकर, महेश लोकेगावकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई, पालक श्री. गोवेकर आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना वामन खोत म्हणाले, आजच्या या डिजीटल जमान्यातून मोबाईल पासून मुलांना दूर करण्याचे काम खूप जिकीरीचे आहे. पालकांनी विद्यार्थ्यांकडून या छोट्या वयात छोट्या पुस्तकांमधील थोर पुरुषांच्या शौर्य कथा, रामायण महाभारत मधील कथा, ज्या मनावर चांगले संस्कार करू शकतील, अशी पुस्तके वाचून घेतली पाहिजेत. त्यातूनच विद्यार्थी पुढील आयुष्यात चांगले वाचक बनतील, सदृढ संस्कारीक नागरीक बनून जनकल्याणाचे काम त्यांच्या हातून घडेल, तसेच येणारी पिढी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडण्यास मदत होईल, असेही श्री. खोत म्हणाले. शेवटी महेश लोकेगावकर यांनी आभार मानले
