कणकवली ः मुंबईहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या कारची (एमएच 48 सीके 1221) मुंबई-गोवा माहामार्गाच्या बाजूला थांबलेल्या रिक्षेला (एमएच 07 एएच 2612) मागाहून धडक बसली. या अपघातात रिक्षाचालक संदीप पांडुरंग चाळके (35, रा. बेळणे) गंभीररित्या जखमी झाले. हा अपघात दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास जानवली येथील रिलॅक्स हाॅटेलनजीक घडला.
ही धडक एवढी तीव्र होती की रिक्षा महामार्गाच्या बाजूला कलंडली व फरफटत गेली. यात रिक्षा चालक संदीप चाळके हे जखमी होऊन त्यांच्या उजव्या हाताला, पायाला व अन्यत्र दुखापती झाल्या. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस पाटील मोहन सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांनी रुग्णावाहिकेतून अपघातग्रस्त संदीप यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, कणकवली पोलीस ठाण्याचे वाहतूक हवालदार विनोद चव्हाण, राजाराम पाटील, महामार्ग पोलीस विभागाचे राजाराम गोसावी, हवालदार राजेश ठाकूर, कॅलिस डिसोजा, पोलीस नाईक राजेंद्र दळवी, चंद्रकांत बागायकर अादी दाखल झाले होते.
जानवलीतील अपघातात रिक्षाचालक जखमी…
