कार्यकर्ता असलेल्या ठेकेदाराला हाताशी धरत लांज्याच्या लोकांचे पाणी पळविले:निलेश राणे यांचा गंभीर आरोप
ओरोस ता १४-:उबाठा शिवसेनेचे कार्यकर्ते रवींद्र डोळस यांनी आपल्या कंपनीच्या नावे लांजा तालुक्यातील जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे ३४ कोटी रुपयांची कामे आहेत. त्यातील त्यांनी केवळ १६ लाखांची कामे पूर्ण केली आहेत. मात्र, १६ कोटी रुपयांची बिले काढली आहेत. ठाकरे सरकार अस्तित्वात असताना हा प्रताप घडला असून याला खा विनायक राऊत यांचा वरदहस्त आहे. रवींद्र डोळस यांनी यातील ३ कोटी २५ लाख रुपये खा राऊत यांना दिल्याचा पुरावा आपल्या जवळ आहे. त्यामुळे आपण या पुराव्याच्या आधारे फौजदारी तक्रार दाखल करणार आहोत, असा आरोप भाजप प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील ओरोस फाटा येथील गोविंद सुपर मार्केट येथे असलेल्या कार्यालयात निलेश राणे यांनी ह गंभीर आरोप केला. यावेळी भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, राज्य प्रतिनिधी संध्या तेरसे, युवा मोर्चाचे पप्या टवते आदी उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना राणे यांनी, खा राऊत यांनी रवींद्र डोळस या ठेकेदाराला हाताशी धरून लांजा तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेत मोठा भ्रष्टाचार केला आहे. ठेकेदार हे उबाठा शिवसेनेचे सक्रिय सभासद आहेत. लांजा तालुक्यातील १०९ महसूल गावांसाठी ६४ कोटी ४१ लाख ६७ हजार रुपये एवढा निधी मंजूर झालेला आहे. यातील ३५ गावांतील ३३ कोटी ९२ लाख ३० हजार रुपये किमतीची कामे रवींद्र डोळस मुख्य प्रमोटर असलेल्या शिवसाई असोसिएट या कंपनीला मिळाली आहेत. यातील केवळ एका गावातील १६ लाखाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, १६ कोटी रुपयांची बिले काढली गेली आहेत.
लांजा तालुक्यातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून खा राऊत यांच्या मर्जीने भ्रष्टाचार करण्यात आला आहे. ही कामे पूर्ण करण्यासाठी विहित कालावधी असतो. तो कालावधी उलटून गेला तरी ती कामे पूर्ण झालेली नाहीत. ठाकरे सरकार अस्तित्वात असताना ही मेहेरबानी झाली आहे, असे सांगतानाच ठेकेदार कंपनीने नळ योजनेसाठी वापरलेली पाईप लाईन बोगस असल्याचे फोटो सुद्धा पत्रकार परिषदेत सादर केले. तसेच या भ्रष्टाचारातील सव्वा तीन कोटी रुपये खा राऊत यांना देण्यात आले आहेत. हे पैसे कसे आणि कुठे विनायक राऊत यांनी स्वीकारले, त्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. कुठल्या हॉटेल मध्ये बैठक झाली. कोणत्या ठिकाणी गाडीत बैठक झाली. कोणकोणत्या हवाला मार्फत हे पैसे खा राऊत यांना देण्यात आले आहेत, त्याचे पुरावे आपण जमा केले आहेत. हे सर्व पुरावे आपण तपास यंत्रणेला देणार आहोत, असेही यावेळी निलेश राणे यांनी सांगितले.
चौकट
खा राऊत आपण सभ्य असल्याचे दाखवितात. प्रत्येक्षात ते तसे नाहीत. त्यांचे प्रताप समोर येवू लागल्याने ते आता उघडे पडले आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची मालिका आपण उघड करणार आहोत. या भ्रष्टाचारातून आलेले पैसे निवडणुकीला वापरले जाणार आहेत. ते ठेकेदारांकडे निवडणूकीसाठी पैसे देण्याकरिता तगादा लावत आहेत. याचाही उलगडा आपण करणार आहोत, असे यावेळी निलेश राणे यांनी सांगितले.
पाणी पळविणारा खासदार
जल जीवन मिशन योजनेत वैयक्तिक स्वार्थासाठी भ्रष्टाचार करून लांजा तालुक्यातील जनतेचे पाणी पळविण्याचे काम खा राऊत यांनी केले आहे. त्यामुळे पाणी पळविणारा खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे खासदारकी, असे विनायक राऊत यांचे झाले आहे. परंतु त्यांची स्टोरी आता संपली आहे. त्यांची निवृत्ती निश्चित आहे. उध्दव ठाकरे यांच्यासमोर मोठेपणा घेण्यासाठी ते नारायण राणे यांच्यावर पत्रकारांसमोर टीका करीत आहेत. समोर आल्यावर मात्र त्यांची देहबोली बदलते, असेही निलेश राणे यांनी यावेळी सांगितले.
चौकट
तसेच एम एस एम ई या खात्याचे स्वतःच नारायण राणे लाभार्थी असल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना निलेश राणे यांनी आम्ही आमची इमारत एम एस एम ई या खात्याला विनामूल्य दिली आहे. तुम्ही माहितीच्या अधिकारात याची माहिती घेवू शकता. परंतु जर आम्ही याचे भाडे घेतले नाहीतर विनायक राऊत नारायण राणे यांचे पाय धरुन माफी मागतील का ? असाही प्रश्न केला.
फोटो ओळ:- सिंधुदुर्गनगरी: पत्रकार परिषदेत लांजा तालुक्यातील बोगस पद्धतीने झालेल्या जल जीवन योजनेच्या कामांचे फोटो दाखविताना निलेश राणे सोबत दादा साईल, पप्या टवते
