बांदा उपसरपंच राजाराम सावंत यांची माहिती..
⚡बांदा ता.०३-: सावंतवाडी तालुक्यातील पूरग्रस्तांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम ही तात्काळ अदा करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती बांदा उपसरपंच राजाराम उर्फ बाळु सावंत यांनी दिली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील बांदा, शेर्ले, वाफोली, इन्सुली गावात २०२० व २०२१ रोजी महापूर आला होता. त्यावेळी शेकडो दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी गेल्याने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. यातील बऱ्याच नुकसानग्रस्ताना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. शासनाकडून पुन्हा नुकसाग्रस्त ग्रामस्थांची यादी मागविण्यात आली असून पुन्हा कागदपत्रे गोळा करून ती आपल्या कार्यालयाला सबमिट करण्याची सक्ती करण्यात येत आहे. मात्र पहिल्यावेळी पंचनामा जोडण्यात आला असून स्वतः तलाठी यांनी ही यादी बनविली होती. असे असताना पुन्हा कागदपत्रांची मागणी करणे हे नुकसानग्रासतांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जुन्या पंचनामा यादीनुसारच तात्काळ भरपाईची रक्कम खात्यात वर्ग करण्यात यावी.
काही गावातील पंचनाम्याच्या प्रति या गहाळ झाल्याने याला सर्वस्वी अधिकारी व महसूल कर्मचारी जबाबदार असल्याने पूरग्रस्तांना पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची सक्ती करू नये. यासाठी लवकरच पालकमंत्री चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधणार असल्याचे श्री सावंत यांनी सांगितले.
