⚡कुडाळ ता.३१-: कळसूबाई मिलेट्स नाशिक यांच्या सौज्यन्याने निसर्ग संवाद उपक्रमातून पारंपारिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन हा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ मार्च २०२४ रोजी वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुरपार येथे संपन्न झाला.
यावेळी कळसुबाई मिलेट्सचे संस्थापक नाशिक येथील श्रीम. नीलिमा जोरावर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांचे भरडधान्य महत्त्व व संवर्धन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान झाले. महाराष्ट्राच्या विविध प्रदेशातील पारंपारीक भरडधान्य यांचा उपयोग शेतकरी व इतर सामान्य जनता यांना व्हावा यासाठी श्रीम. नीलिमा जोरावर ह्या गेली पंधरा वर्षे मिलेट्स व रानभाज्या यांचे महत्व या विषयी प्रचार व प्रसार होण्यासाठी निसर्ग संवाद, शिबिरे, मिलेट व पारंपारिक अन्न महोत्सवाचे आयोजन महिला, शेतकरी यांचेसाठी करीत आहेत. या कार्यक्रमांमधून रानभाज्या व भरडधान्याचे दैनंदिन आहारामध्ये असणारे महत्त्व, आरोग्यावर होणारे सकारात्मक बदल आणि त्यातून प्राप्त होणारी निरोगी जीवनशैली याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर शेती उत्पादनाच्या पारंपारिक आणि सुयोग्य पद्धती याविषयावर संवादही उपस्थित श्रोत्यांशी साधण्यात आला. भरडधान्य व पारंपरिक बियाण्याची माहिती देणारे एक प्रदर्शनही मांडण्यात आले होते. या निमित्ताने वसुंधरा मार्फत नेरूर येथील रानभाज्या अभ्यासक रामचंद्र शृंगारे आणि पारंपारीक बियाणे संकलक सूर्यकांत कुंभार यांचा सन्मानपत्र देऊन श्रीम. नीलिमा जोरवर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मुंबई येथील वसुंधरा सल्लागार समितीचे अशोक राणे, कार्यवाह विश्वस्त सतिश नाईक आणि वसुंधराचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ५० पेक्ष जास्त शेतकरी व निसर्ग प्रेमी उपस्थित होते त्यांनी या प्रदर्शनाचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
वसुंधरा नेरुरपार येथे पारंपारिक भरडधान्य महत्त्व व संवर्धन कार्यक्रम संपन्न…
