⚡वेंगुर्ला ता.३१-: आजकाल इंग्रजी शाळेकडे पालकांचा ओढा वाढलेला असताना सुद्धा शिशुवाटीकेमध्ये मुलांना दाखल करणा-यांची संख्या काही कमी नाही. शिशुवाटीकेमधील मुलांच्या पालकांनी उचललेले हे पाऊल अतिशय योग्य दिशेने आहे. याठिकाणी घेत असलेल्या विविध उपक्रमांमुळे मुलांना निश्चित संस्काराचे बाळकडू मिळेल असे प्रतिपादन पंचायत समिती वेंगुर्ला येथील समग्र शिक्षा अभियान, गट साधन केंद्राच्या विषयतज्ञ शिवानी आळवे यांनी केले.
वेंगुर्ला येथील सरस्वती शिशुवाटीकेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण समारंभ ३० मार्च रोजी वेंगुर्ला नगरवाचनालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर विषयतज्ज्ञ शिवानी आळवे, पत्रकार प्रथमेश गुरव, ॲड.श्रीकृष्ण ओगले, पालक प्रतिनिधी अश्विनी देऊलकर,प्रभाकर पालकर, शिशुवाटिकेच्या संचालिका दिप्ती मांजरेकर-उडीयार आदी उपस्थित होते.
शिशूवाटीकेच्या संकल्पनेबाबत शिवानी आळवे यांनी माहिती दिली. तर प्रथमेश गुरव यांनी शुभेच्छा दिल्या. व्यासपिठावरील मान्यवरांच्या हस्ते मुलांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा घाडी, स्वागत दिप्ती मांजरेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुलांच्या पालकांचे व शिक्षणप्रेमींचे सहकार्य लाभले.
