Headlines

कै. अँड. अभय देसाई स्मृती भजन स्पर्धा कार्यक्रम जाहीर ; ११ ला शुभारंभ…

जिल्हाभरातून २२ भजन संघ सहभागी:विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन..

⚡कुडाळ ता.०९-: श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने कै. अँड. अभय देसाई स्मृती ५१ वी सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. श्री देव कुडाळेश्वर मंदिरात होणाऱ्या या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्यातील भजन मंडळांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, ११ ते १८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध २२ भजन मंडळांचे सादरीकरण होणार आहे. यानिमित्ताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
स्पर्धेच्या कार्यक्रमाची सुरुवात रविवार, ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन सोहळ्याने होणार आहे. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अॅड. संदेश तायशेट्ये (कुडाळ) हे उपस्थित राहणार आहेत. हॉटेल लाईम लाईट, कुडाळचे प्रोप्रायटर प्रदीप गजानन माने यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी प्रकाश इंजिनिअरिंग वर्क्स, कुडाळचे प्रोप्रायटर महादेव अनंत ऊर्फ बबन परब, लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, कुडाळचे अमेय देसाई तसेच नगरसेवक अभिषेक गावडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर नियोजित वेळापत्रकानुसार विविध भजन मंडळे आपली सेवा सादर करतील.

विजेत्यावर बक्षिसांची बरसात

भजन स्पर्धेतील विजेत्यांवर बक्षिसांची बरसात करण्यात आली आहे. या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या मंडळाला कै. प्रकाश पाटणकर यांच्या स्मरणार्थ मे. लक्ष्मी ज्वेलर्स, पाटणकर बंधू, कुडाळ यांच्याकडून रोख २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला कै. मंदार कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ श्री. रमण व कै. सौ. वैशाली कुलकर्णी यांच्याकडून रोख १५ हजार रुपये, तृतीय क्रमांकाला श्री. आर. आर. कोल्हेकर, वर्तकनगर, ठाणे यांच्याकडून रोख रु.  १० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकाला श्री एंटरप्राइज कुडाळ यांच्याकडून रोख ५ हजार रुपये, तर पाचव्या क्रमांकाला श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्याकडून रोख  २ हजार ५०० रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय सर्व विजेत्यांना कै. काशिनाथ रामचंद्र मालवणकर यांच्या स्मरणार्थ मे. सिंधुविनायक ज्वेलर्स, कुडाळ (श्री. संतोष मालवणकर) यांच्याकडून कायमस्वरूपी चषक देण्यात येणार आहेत. 
 तसेच उत्कृष्ट तबलावादक साठी मृदूंगमणी बाबा परब, केरवडे  यांच्या कडून  रोख रु. १०००/- तर उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट हार्मोनियम वादक, उत्कृष्ट पखवाज वादक, उत्तेजनार्थ झान्ज वादक  यांच्यासाठी कै. अच्युत ओटवणेकर यांच्या स्मरणार्थ महेश ओटवणेकर यांच्याकडून प्रत्येकी रोख रु. १ हजारांचे पारितोषिक आहे.

जिल्हाभरातून २२ भजन मंडळे सहभागी

स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार रविवार, ११ ऑक्टोबर रोजी श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, पावशी आणि वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ, रानबांबुळी यांचे सादरीकरण होईल. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी रामनाथ भजन मंडळ, तेंडोली आणि गुरुकुल संगीत भजन मंडळ, कुडाळ सहभागी होणार आहेत. मंगळवार, १३ ऑक्टोबर रोजी श्री लिंगेश्वर-सातेरी प्रासादिक भजन मंडळ, सरंबळ तसेच विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ, राठीवडे आणि पिंगुळी या मंडळांचे सादरीकरण होईल.
बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी श्री देवी सातेरी भजन मंडळ, सातूळी आणि सद्गुरू संगीत भजन मंडळ, कुडाळ यांची भजने होतील. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी जगन्नाथ प्रासादिक भजन मंडळ, मांडकुली, योगेश्वर प्रासादिक महिला भजन मंडळ, पावशी आणि रत्ननाथ प्रासादिक भजन मंडळ, घोडगे सहभागी होणार आहेत.
शुक्रवार, १६ ऑक्टोबर रोजी जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ, वालावल आणि श्री म्हाळसाई भजन मंडळ, साळगाव यांचे सादरीकरण होईल. शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी स्वरब्रह्म भजन मंडळ, देवगड-जामसंडे आणि श्री देव भोम प्रासादिक भजन मंडळ, आंदुर्ले यांची भजने होतील. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, कोचरा, श्री स्वामी समर्थ संगीत भजन मंडळ, तुळसुली आणि श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी यांचे सादरीकरण होणार आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

या स्पर्धेच्या निमित्ताने सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता सर्व मंगल मांगल्य सामूहिक जप आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत श्री देव कुडाळेश्वर मंदिरात सर्व महिला भगिनींसाठी हळदीकुंकू समारंभ होणार आहे.
तसेच सोमवार, १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान रोज सायंकाळी ४ वाजता ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण होईल. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता काल्याचे कीर्तन आणि प्रसाद होणार आहे. सोमवार दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी श्री देव कुडाळेश्वराची समाराधना होणार असून त्यानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 
या धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page