⚡कुडाळ ता.१३-: तालुक्यातील पिंगुळी येथील श्री गौरीशंकर मंदिराचा २९ वा वर्धापनदिन सोहळा आणि प.पू. सद्गुरू समर्थ अण्णा राऊळ महाराज यांचा ७९ वा जयंती सोहळा १३ बुधवारी भावपूर्ण वातावरणात व असंख्य भाविकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक विविध कार्यक्रमांचा लाभ असंख्य लोकांनी घेतला. यावेळी मठातील वातावरण भक्तिमय झाले होते.
यानिमित्त १२ मार्च या दिवशी पहाटे नित्य काकड आरती, महाआरती, दुपारी महाप्रसाद, स्थानिकांची भजने, सायंकाळी सांजआरती, महाप्रसाद, कीर्तन झाले. त्यानंतर प.पू. सद्गुरु समर्थ अण्णा राऊळ महाराज यांच्या जयंती सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला. १३ मार्च या सोहळ्याच्या मुख्य दिवशी पहाटे काकड आरती, प.पू. राऊळ महाराज समाधी पूजन आणि सार्वजनिक अभिषेक, नामस्मरण, श्री गौरीशंकर मंदिरात लघुरुद्र, प.पू. विनायक (अण्णा) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी आणि ‘विवेकानंद नेत्रालय आणि रेटीना सेंटर, कुडाळ’ यांच्या सहकार्याने नेत्रतपासणी मोतीबिंदु तपासणी शिबीर, प.पू. सद्गुरु अण्णा महाराज पादुका पूजन, महाआरती, अपंगाना ‘कृत्रिम जयपूर फूट’चे वाटप, दुपारी १२.३० वाजता श्रींची आरती झाली. त्यानंतर महाप्रसाद, दिंडी, भजन, दुपारी ३ वाजता प.पू. सद्गुरु अण्णा राऊळ महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. भजन, सायंकाळी सांजआरती, सुश्राव्य भक्ती संगीत कार्यक्रम, दिंडी, असे विविध कार्यक्रम झाले. यानिमित्त श्री गौरीशंकर मंदिरात, तसेच प.पू. सद्गुरु समर्थ राऊळ महाराज, प.पू. सद्गुरु अण्णा राऊळ महाराज यांच्या समाधींचे दर्शन आणि महाप्रसाद यांचा लाभ सहस्रो भाविकांनी घेतला. या सोहळ्याला कोल्हापूर येथील प.पू. आनंद महाराज आणि सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांची उपस्थिती लाभली होती. या वेळी दोन्ही संतांचा प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिराच्या वतीने श्री. विठोबा विनायक राऊळ यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. श्री क्षेत्र पंढरपूर येथे असलेल्या प.पू. राऊळ महाराज स्मारक मंदिरात प.पू. सद्गुरु अण्णा राऊळ महाराज मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा १४ आणि १५ एप्रिल या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात येणार्या प.पू. सद्गुरु अण्णा राऊळ महाराज यांच्या मूर्तीचे १३ मार्च रोजी प.पू. राऊळ महाराज समाधी मंदिरात ढोलताशांच्या गजरात मिरवणुकीने आगमन झाले. यावेळी मठातील वातावरण भक्तिमय झाले होते. भक्तगण या सोहळ्या तल्लीन झाले होते.
पिंगुळी नगरीत प.पू. स. स. अण्णा राऊळ महाराज जयंती सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा..
