⚡दोडामार्ग, ता.१३-: तिलारी वसाहतीतील आंब्याच्या झाडावरून पडल्याने बाळकृष्ण उर्फ गोट्या जाधव (वय 35, रा.साटेली भेडशी – विमानतळ ) या युवकाचा जागीच मृत्यू झाला.तो दोडामार्ग पोलिस ठाण्याअंतर्गत होमगार्ड म्हणून काम करायचा.
जाधव कुटुंब पूर्वी कोनाळकट्टा येथील वसाहतीत राहायचे. अलीकडेच त्यांनी साटेली भेडशी – विमानतळ येथे घर बांधले होते.तेथे सर्वजण राहायचे. गोट्या दुपारी कोनाळकट्टा येथील तिलारी वसाहतीतील आंब्याच्या झाडावर कैऱ्या काढण्यासाठी चढला. त्यादरम्यान त्याचा तोल जाऊन तो पडला असवा.बाजूच्या रस्त्याने जाणाऱ्या गाडीवाल्याने त्याला पाहून ज्या दुकानात तो फावल्या वेळेत काम करायचा त्याला कळवले. त्यानंतर धावपळ करुन त्याला साटेली भेडशी आरोग्य केंद्रात नेले. तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारची जखम नव्हती किंवा रक्तस्त्राव झाला नव्हता. उशिराला रात्री विच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या मागे आई, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
सर्वांचे डोळे पाणावले
बाळकृष्ण गोट्या म्हणून सर्वपरिचित होता.त्याचा मित्र परिवार मोठा होता. त्याच्या मृत्यूची बातमी कळताच पोलिस, होमगार्ड आणि अन्य क्षेत्रातील अनेकांनी आरोग्य केंद्रात गर्दी केली होती. अनेकांना यावेळी अश्रू आवरत नव्हते.
