परिपूर्ण कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णांच्या सेवेच्या प्रतीक्षेत…

गणेश पेडणेकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू..

सिंधुदुर्गनगरी ता १३
कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची नूतन इमारत बांधून तीन वर्षाचा कालावधी लोटला तरी सदर इमारतीचे उद्घाटन न झाल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कासार्डे येथील गणेश तुकाराम पेडणेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची तीन वर्षांपूर्वी नवीन इमारत बांधण्यात आली आहे. सदर इमारत उद्घाटना विना बंद अवस्थेत असून सद्यस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मुख्य इमारतीच्या बाजूला असलेल्या हॉलमध्ये चालत आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. कोठ्यावधी रुपये खर्च करून बांधलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जर प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे बंद अवस्थेत राहत असेल तर ते जनहितासाठी योग्य नाही. त्यामुळे सदर इमारतीचे तात्काळ उद्घाटन करून आरोग्य सेवेसाठी खुली करावी अशी मागणी सामाजिक व महिती अधिकार कार्यकर्ता श्री पेडणेकर यांनी निवेदनातून केली आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम तीन वर्षांपूर्वी पूर्ण होऊनही या इमारतीच्या उद्घाटनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही, यावरून लोकप्रतिनिधींची व प्रशासनाची अनास्था दिसून येते. तरी या इमारतीचे तात्काळ उद्घाटन करून रुग्णांच्या उपचारासाठी ही इमारत खुली करावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी कासार्डे येथील गणेश तुकाराम पेडणेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

You cannot copy content of this page