भविष्याचा विचार करता भुगर्भातील पाणीसाठा वाढवीने गरजेचे…

वकील स्वरूप पई:भंडारी हायस्कूल येथे जलदीन साजरा

मालवण (प्रतिनिधी) कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी पावसाचे पाणी शोषून घेण्याची येथील जमिनीची क्षमता कमी आहे. रेन हार्वेस्टिंग सिस्टीमद्वारे पावसाचे पाणी बोअरवेलद्वारे जमिनीत सोडणे गरजेचे आहे. भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता भूगर्भातील पाण्याचा साठा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन मालवण तालुका विधी सेवा समितीचे ऍड. स्वरूप पई यांनी भंडारी हायस्कुल मालवण येथे बोलताना केले. मालवण तालुका विधी सेवा समिती आणि मालवण तालुका वकील संघटना यांच्या वतीने मालवण येथील भंडारी ए.सो. हायस्कुलमध्ये जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावर ऍड स्वरूप पई, ऍड. अक्षय सामंत, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक एच.बी.तिवले मालवण न्यायालयाचे लिपिक संदीप परब, आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक व्ही.जी. खोत यांनी प्रास्ताविक करत स्वागत केले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके आहे. त्याचा जपून वापर करणे आणि त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे, असे यावेळी श्री. खोत यांनी सांगितले. यावेळी ऍड. स्वरूप पई म्हणाले, कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी वाहून जाते. आज गोड्या पाण्याचे स्रोत कमी होत असताना पाऊस हा गोड्या पाण्याचा मोठा स्रोत आहे. मात्र पावसाचे पाणी साठविण्याच्या नियोजनाची आपल्याकडे कमतरता आहे. पाण्याचा वापर जपून करण्याबरोबरच पाणी साठवून पाण्याचे स्रोत निर्माण करणेही गरजेचे आहे. पावसाचे पाणी भूगर्भात साठविल्यास त्याचा फायदा भविष्यात होऊ शकतो असेही ऍड. पई म्हणाले. यावेळी ऍड. अक्षय सामंत म्हणाले, भविष्यातील युद्ध हे पाण्यासाठी होईल. आपण पाण्याचा बेतालपणे वापर करत असतो. आपण मोठ्या प्रमाणावर पाणी फुकट घालवत असतो. भविष्यातील जीवन जगण्यासाठी पाणी वाचविणे गरजेचे आहे. पावसाचे पाणी कसे साठवता येईल, पावसाच्या पाण्याचा कसा वापर करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असेही ऍड. सामंत म्हणाले. यावेळी न्यायालयाचे कर्मचारी शरद बामणे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. मास्क लावून व कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला. फोटो- मालवण येथील भंडारी हायस्कुलमध्ये जागतिक जल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ऍड. स्वरूप पई, सोबत ऍड. अक्षय सामंत, मुख्याध्यापक व्ही. जी. खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले व इतर.

You cannot copy content of this page