शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारिकरण कामाचे ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन…

⚡बांदा ता.०८-: बांदा येथील शासकीय विश्रामगृहाच्या विस्तारिकरण कामाचे आज ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता वैभव सागरे यांनी श्रीफळ फोडले. मात्र या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केलेल्या स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांना निमंत्रण न देता छोटेखानी सोहळा घाईगडबडीत उरकण्यात आल्याने स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनसह भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या मुंबई गोवा महामार्गावर असलेले शासकीय विश्रामगृह गेले कित्येक वर्षे अडगळीत पडले होते. बांदा येथे गेली ३० वर्षे भाजपाची एकहाती सत्ता आहे. यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून शासकीय विश्रामगृहाचे विस्तारिकरण करावे अशी मागणी केली होती. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पत २ कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. लोकसभा निवडणूक तोंडावर आल्याने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २९ कामांचे ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आले. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची नावे निमंत्रण पत्रिकेत समाविष्ठ आहेत.
आज सकाळी ११ वाजता बांदा विश्रामगृहाचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वैभव सागरे, कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांच्यासह ठेकेदार उपस्थित होते. १० मिनिटात भूमिपूजन कार्यक्रम उरकण्यात आला. यावेळी कोणीही स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच यांना निमंत्रण नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page