Headlines

राज्यस्तरीय आर्थिक साक्षरता समितीवर प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांची निवड

बांदा/प्रतिनिधी
बांदा येथील गोगटे-वाळके महाविद्यालयाचे वाणिज्य विभागप्रमुख प्रा. डॉ. रमाकांत गावडे यांची महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय आर्थिक साक्षरता समितीवर निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
प्रा. डॉ. गावडे हे गेली ३० वर्षे गोगटे-वाळके महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागात अध्यापन कार्य करीत आहेत. ‘करिअर कट्टा’ उपक्रमांतर्गत ते गेल्या चार वर्षांपासून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले या तीन तालुक्यांचे समन्वयक म्हणून कार्यरत असून विद्यार्थ्यांमध्ये आर्थिक साक्षरता, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकासासाठी उल्लेखनीय कार्य करीत आहेत.
त्यांच्या उत्कृष्ट कार्याची विविध स्तरांवर दखल घेण्यात आली आहे. त्यांना मुंबई विद्यापीठाचा ‘एनएसएस उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी’ पुरस्कार, केंद्र शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय ‘करिअर कट्टा’ उपक्रमामार्फत सलग दोन वर्षे राज्यस्तरीय उत्कृष्ट समन्वयक पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय आर्थिक साक्षरता समितीवरील त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो:-
प्रा. डॉ. रमाकांत गावडे

You cannot copy content of this page