Headlines

५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी संतोष उर्फ भाऊ भिसे यांची फेरनियुक्ती करा..

शिवसेना नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी यांची मागणी..

​सावंतवाडी:
शहरात नव्याने सुरू असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे योग्य व नियोजनबद्ध काम करण्यासाठी आणि सावंतवाडीकरांना सुरळीत पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी पालिकेने पालिकेचे निवृत्त स्थापत्य अभियंता संतोष ऊर्फ भाऊ भिसे यांची तत्काळ फेरनियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सध्या शहरातही या संदर्भात जोरदार चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

​अ‍ॅड. सायली दुभाषी यांनी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, निवृत्त अभियंता संतोष भिसे हे सन २०१० पासून नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे काम पाहत होते त्यांच्याकडे या क्षेत्रातील प्रचंड दांडगा अनुभव आहे. त्यांच्याच कार्यकाळात पाळणे-कोंड धरण, चिवार-टेकडी आणि केसरी येथील जलशुद्धीकरण इमारतींचे बांधकाम स्वतःच्या देखरेखीखाली दर्जेदारपणे पूर्ण झाले आहे. याशिवाय, नरेंद्र-डोंगर हनुमान मंदिर येथील नैसर्गिक झऱ्याचे रोज सुमारे ४ लाख लीटर पाणी वाया जात होते. हे वाया जाणारे पाणी अडवण्यासाठी तेवढ्याच क्षमतेची साठवणूक टाकी आणि फिल्टर प्लांट कार्यान्वित करण्यासाठी भाऊ भिसे यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच आज शहरातील नागरिकांना रोज ४ लाख लीटर शुद्ध नैसर्गिक पाणी उपलब्ध होत आहे.

​सध्या सावंतवाडी पालिकेतर्फे सुरू असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या या नव्या नळपाणी योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) देखील भाऊ भिसे यांनी स्वतः तयार केला आहे. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी व त्याच्या मंजुरीचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी मुंबईत अनेक वाऱ्या केल्या आहेत. नुकत्याच सोमवारी पार पडलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शहरातील नळपाणी योजनेच्या सद्यस्थितीबाबत काही नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. शहरात अजूनही या योजनेचे जवळपास ५० टक्के काम शिल्लक असून ते रखडलेल्या अवस्थेत आहे.

​या पार्श्वभूमीवर, रखडलेले काम वेळेत पूर्ण करण्यासाठी, योजनेचे योग्य नियोजन करण्यासाठी आणि सावंतवाडीतील नागरिकांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबवून त्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी या विभागाचा पूर्ण अनुभव असलेल्या पालिकेचे निवृत्त अभियंता भाऊ भिसे यांची पालिकेने पुनर्नियुक्ती करणे अत्यंत गरजेचे आहे,या नियुक्ती संदर्भात चर्चा झाली होती परंतु अजून पर्यंत कोणतीच दखल घेतली गेली नाही असे अ‍ॅड. सायली दुभाषी यांनी शेवटी स्पष्ट केले आहे.

You cannot copy content of this page