नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पाठपुराव्याला मोठे यश..
⚡कुडाळ ता.१६-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे साथीचे आजार आणि आरोग्याच्या गंभीर समस्या लक्षात घेता, कुडाळ ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख व कुडाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी शासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यांच्या या जनहितार्थ मागणीची तात्काळ दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर. श्रीपाद पाटील यांनी कुडाळ ग्रामीण रुग्णालयाला लेखी आदेश जारी केले आहेत.
याबाबत माहिती देताना मंदार शिरसाट म्हणाले, पावसाळ्याच्या दिवसांत कुडाळ तालुका व आसपासच्या ग्रामीण भागातील शेकडो रुग्ण उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालयात येत असतात. या काळात डेंग्यू, मलेरिया, लेप्टो यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. अशा वेळी रुग्णांवर योग्य उपचार सुरू करण्यासाठी रक्ताचा तपासणी अहवाल (Blood Test Report) वेळेत मिळणे अत्यंत आवश्यक असते.
मात्र, रुग्णालयातून हे अहवाल वेळेत मिळत नसल्याने रुग्णांचे हाल होत होते व उपचाराला विलंब होत होता. ही गंभीर बाब लक्षात घेऊन मंदार शिरसाट यांनी १४ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय अधिक्षकांकडे लेखी निवेदनाद्वारे तात्काळ रक्त तपासणी अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
मंदार शिरसाट यांच्या या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना तात्काळ अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत.
त्या आदेशानुसार, १) रुग्णालयामध्ये बाह्य (OPD) आणि आंतररुग्ण (IPD) विभागात येणाऱ्या सर्व रुग्णांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यांचे अचूक अहवाल रुग्णांना तात्काळ देण्यात यावेत. २) जर ही रक्त तपासणी रुग्णालयाच्या इन-हाउस (In-house) लॅबमध्ये उपलब्ध नसेल, तर शासनाच्या थेट करारातील ‘मे. एचएलएल लाईफ केअर लि.’ (HLL Life Care Ltd.) यांच्याकडून ही तपासणी करून घेऊन त्याचा अहवाल संबंधित रुग्णांना तात्काळ देण्याची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी.
सामान्य आणि गरीब रुग्णांना वेळेत उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. रक्त तपासणीच्या विलंबामुळे कोणत्याही रुग्णाचा जीव धोक्यात येऊ नये, यासाठीच आम्ही हा पाठपुरावा केला होता.
जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून यामुळे कुडाळमधील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिली. युवासेनेच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे कुडाळ परिसरातील नागरिकांमधून व रुग्णांच्या नातेवाईकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
