महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन
मालवण (प्रतिनिधी)
दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय येथे विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येणार असून, इच्छुक कलाकारांसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे मालवण मधील दशावतार कलाकारांनी पंचायत समिती विशेष नोंदणी कक्षास भेट देऊन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन मालवण नगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांनी केले आहे.
दरम्यान, दशावतार कलाकारांच्या प्रश्नांना विधिमंडळात वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या आमदार निलेश राणे यांचे तसेच दशावतार कलाकारांसाठी वार्षिक साडेचार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून कलाकारांसाठी ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करण्याचा निर्णय घेणारे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांचेही सौ. अन्वेषा आचरेकर यांनी आभार मानले आहेत.
या सर्वेक्षणाद्वारे जिल्ह्यातील दशावतार कलाकार, दशावतार मंडळे तसेच या लोककलेशी संबंधित विविध घटकांची अद्ययावत माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील दशावतार परंपरेचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि भविष्यातील विविध सांस्कृतिक उपक्रमांचे नियोजन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे. सदर उपक्रम राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. मालवण मधील दशावतार कलाकारांनी पंचायत समिती विशेष नोंदणी कक्षास भेट देऊन नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन सौ. अन्वेषा आचरेकर यांनी केले आहे.
