पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती..
मालवण ता १०-:
सिंधुदुर्गचे जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अगरवाल यांच्या संकल्पनेतून जिल्हाभरात ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग जिल्हा हे अभियान आजपासून सुरु होऊन २४ जानेवारी पर्यंत राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत मालवण तालुक्यात ड्रग्स विरोधी व व्यसनमुक्ती बाबत जनजागृती करण्यात येणार आहे तसेच अवैध ड्रग्स धंद्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आज मालवण पोलीस स्थानक येथे मालवण मधील पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी मालवण तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष संतोष गावडे, सचिव सौगंधराज बादेकर, कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, जिल्हा सदस्य विद्याधर केनवडेकर, प्रशांत हिंदळेकर, कुणाल मांजरेकर, अमित खोत, कृष्णा ढोलम, महेश कदम, भूषण मेतर, संग्राम कासले, आपा मालंडकर, ओंकार यादव आदी पत्रकार तसेच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे, उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, वाहतूक पोलीस गुरूदास परब आदी उपस्थित होते. यावेळी पोलीसांनी पत्रकारांशी विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे म्हणाले, ड्रग्स मुक्त सिंधुदुर्ग अभियान अंतर्गत मालवण तालुक्यात जनजागृती व कारवाई असे दोन टप्पे राबविण्यात येणार आहेत. शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी ड्रग्स विरोधी जनजागृती करून तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन करण्यात येणार आहे. व्यसनमुक्तीसाठी मनसोपचार तज्ज्ञ मार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच शाळा, महाविद्यालयात व्यसनमुक्ती बाबत पोस्टर व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर ज्याठिकाणी गांजा विक्री सुरु आहे, तसेच याबाबतचे अवैध धंदे जेथे सुरु आहेत त्याठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष पोलीस पथक नेमण्यात येणार आहे. यामध्ये आरोपीना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे, या अभियानासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. कोल्हे यांनी केले.
