Headlines

लांजा येथील अपघातात जखमी झालेल्या आडवलीतील तरुणाचा मृत्यू

मालवण (प्रतिनिधी)

मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजानजीक आंजणारी पुलावर शुक्रवारी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास सोळाचाकी ट्रक आणि लक्झरी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या मालवण तालुक्यातील आडवली-तांबळवाडी येथील रघुवीर उर्फ किरण बाळकृष्ण मसुरकर (वय ३५) या तरुणाचे उपचारादरम्यान शनिवारी सकाळी रत्नागिरी येथील रुग्णालयात निधन झाले.

दिवाळी आणि भाऊबीज साजरी करण्यासाठी किरण मसुरकर हे पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसह मुंबईला गेले होते. दिवाळी साजरी केल्यावर पत्नी व मुलीला काही दिवस मुंबईतच ठेवून काही कामानिमित्त गावी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. किरण हे खासगी बसने मुंबईहुन मालवणच्या दिशेने प्रवास करत असताना मुंबई-गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा नजीक आंजणारी पुलावर बस आणि सोळा चाकी ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन्ही वाहनांमधील चालकांसह २६ हून अधिक प्रवासी जखमी झाले. यामध्ये मसुरकर हे गंभीर जखमी झाले होते. रत्नागिरी येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

रघुवीरे उर्फ किरण मसुरकर हे आडवली ग्रामपंचायतीमध्ये जबाबदारीसोबतच ‘सीएससी” सेंटरच्या माध्यमातून ते ग्रामस्थांना विविध शासकीय व ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देत होते. मनमोकळा स्वभाव, प्रत्येकाशी आपुलकीने बोलण्याची पद्धत आणि दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती यामुळे त्यांनी गावात आणि परिसरात मोठा मित्रपरिवार निर्माण केला होता. गावातील अनेकांच्या कामी येणारा, प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा हा तरुण आज कायमचा निघून गेल्याने त्यांच्या परिचितांवर शोककळा पसरली आहे.

अवघ्या तीन वर्षांपूर्वी किरण यांनी संसाराची नवी सुरुवात केली होती. पत्नीच्या साथीने आणि चिमुकल्या मुलीच्या आगमनाने त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ मिळाला होता. मात्र पत्नी व मुलीसोबत दिवाळी साजरी केल्यावर दुर्दैवाने काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने या कुटुंबाची सर्व स्वप्ने विरून गेली आहेत. किरण मसुरकर यांच्या अकाली जाण्याने मसुरकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

शनिवारी रात्री आडवली येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रघुवीर उर्फ किरण मसुरकर यांच्या पश्चात पत्नी, एक वर्षाची मुलगी, आई, भाऊ आणि भावजय असा परिवार आहे.

You cannot copy content of this page