दीपोत्सव आणि गंगा महाआरतीने तलाव परिसर उजळला:धार्मिक पर्यटनाला नवी दिशा..

⚡कुडाळ ता.१५-: कुडाळ तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालावल येथील श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिरात आयोजित भव्य महाविष्णूयाग सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील होन्नावर येथील ४० आणि वालावल परिसरातील १३ अशा एकूण ५३ पुरोहितांच्या मंत्रोच्चारात, अखंड विष्णुनामजप आणि होम-हवनाने गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हा धार्मिक सोहळा संपन्न झाला. मंदिर परिसरातील नयनरम्य तलावाच्या काठावर आयोजित दीपोत्सव आणि गंगा महाआरती हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले.
श्रीदेव लक्ष्मीनारायणादी स्थानिक सल्लागार उपसमिती, वालावल यांच्या सहकार्याने पंतवालावलकर परिवाराच्या वतीने १२ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत या महाविष्णूयागाचे आयोजन करण्यात आले होते. १२ नोव्हेंबर रोजी देवप्रतिष्ठापना, विष्णू आवाहन आणि पूजनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर १३ आणि १४ नोव्हेंबर रोजी अखंड विष्णुनामजप, होम-हवन आणि विविध धार्मिक विधी पार पडले. होन्नावर येथील ज्योतिषी व पुरोहित संतोष भट यांच्या मार्गदर्शनाखाली ५३ पुरोहितांनी या धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
या सोहळ्यानिमित्त मंदिराशेजारील नयनरम्य तलावाच्या काठावर भव्य दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुरोहित, ग्रामस्थ आणि भाविकांच्या उपस्थितीत हजारो दिव्यांच्या प्रकाशाने तलाव परिसर उजळून निघाला. त्यानंतर झालेल्या गंगा महाआरतीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
यावेळी बोलताना उद्योजक अनिरुद्ध पंतवालावलकर म्हणाले की, वालावल हे सुमारे ८०० वर्षांपूर्वीच्या श्रीदेव लक्ष्मीनारायण मूर्तीमुळे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लाभलेले तीर्थक्षेत्र आहे. या गावातील आध्यात्मिक परंपरा अधिक समृद्ध व्हावी, नव्या पिढीला अध्यात्माची दिशा मिळावी आणि सर्वांचे जीवन आरोग्यदायी व सुखकर व्हावे, या उद्देशाने महाविष्णूयाग आणि गंगा आरतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यात आम्ही केवळ माध्यम आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. वालावलमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने मंदिरालगतच्या तलावाला गंगेचे स्वरूप देऊन गंगा महाआरती आयोजित करण्यात आली. अडीच वर्षांपूर्वीही येथे महाविष्णूयाग झाला होता, असे त्यांनी सांगितले.
सरपंच राजेश प्रभू यांनी या धार्मिक उपक्रमामुळे गावातील आध्यात्मिक वातावरण अधिक समृद्ध होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले. धार्मिक उपक्रमांसोबतच वालावलमधील पर्यटन विकास, जैवविविधतेचे संवर्धन आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यात प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुरोहित संतोष भट यांनी हा दुसरा महाविष्णूयाग असून सर्वांच्या शांती आणि कल्याणासाठी त्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. गेल्या चार दिवसांपासून भाविकांच्या सहभागातून हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडल्याचे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला ज्येष्ठ उद्योजक नारायण पंतवालावलकर, उद्योजक अनिरुद्ध पंतवालावलकर, अनुराग पंतवालावलकर, सरपंच राजेश प्रभू, गुरु देसाई, संदेश मयेकर, निलेश साळसकर यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविष्णूयाग सोहळ्याच्या यशस्वितेसाठी देवस्थान समितीचे कर्मचारी व व्यवस्थापक आकाश मठकर, महेश हळदणकर, श्री कवटकर आणि दादू जुवेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीदेव लक्ष्मीनारायणादी स्थानिक सल्लागार उपसमितीचे लक्ष्मण ऊर्फ गुरु देसाई आणि होन्नावर येथील मुख्य पुरोहित संतोष भट यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
