⚡वैभववाडी ता.१४-: भुईबावडा घाट रस्त्यावर आईपासून चुकून दूर आलेल्या अवघ्या चार ते पाच दिवसांच्या सांबराच्या पिल्लाला वनविभाग आणि रेस्क्यू टीमच्या तत्परतेमुळे सुखरूपपणे त्याच्या आईजवळ पोहोचवत पुनर्मिलन करण्यात यश आले. भुईबावडा घाट रस्त्यावरून जात असताना सांबराचे अवघ्या चार ते पाच दिवसांचे पिल्लू आईपासून चुकून दूर आल्याचे निदर्शनास आले. एवढ्या लहान वयातील पिल्लू रस्त्यावर एकटे असल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच वनविभागाला माहिती देण्यात मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
वनक्षेत्रपाल कणकवली सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल वैभववाडी सुरेश पटकारे, वनरक्षक भुईबावडा रामदास घुगे आणि वनसेवक कृष्णा पाताडे यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. रेस्क्यू टीमच्या सदस्यांनीही बचावकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने सांबराच्या पिल्लाला हाताळण्यात आले. त्यानंतर ते ज्या ठिकाणी आढळले होते, त्याच परिसरात बाजूला असलेल्या त्याच्या आईजवळ सुखरूप सोडण्यात आले. आपल्या पिल्लाला जवळ पाहताच आई सांबराने त्याला स्वीकारले. त्यानंतर आई आणि पिल्लू दोघेही जवळच्या जंगलात आपल्या नैसर्गिक अधिवासात निघून गेले.अवघ्या चार ते पाच दिवसांच्या सांबराच्या पिल्लाला कोणतीही इजा न होता त्याच्या आईच्या कुशीत सुरक्षित पोहोचविण्यात वनविभाग आणि रेस्क्यू टीमला आलेले यश समाधानकारक ठरले आहे. वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासातील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी वनविभाग आणि रेस्क्यू टीमने दाखविलेली तत्परता व संवेदनशीलता कौतुकास्पद आहे.
या बचाव मोहिमेत रेस्क्यू टीमचे रिद्धेश तेली, विठ्ठल बिडये, मयूर राणे, निलेश मोरये , हरेश सावंत यांनी सहभाग घेतला.

