२२ किलोमीटर लांबीच्या कालव्याचे तातडीने सर्वेक्षण करून गळती रोखण्याची मागणी; पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता

बांदा/प्रतिनिधी
तिलारी प्रकल्पांतर्गत असलेला बांदा शाखा कालवा येत्या १२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. मात्र, सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून भूजल पातळीतही सातत्याने घट होत आहे. त्यामुळे आगामी काळात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता लक्षात घेता, बांदा शाखा कालव्याची तातडीने साफसफाई व दुरुस्ती करून पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी बांद्याचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब आणि राजाराम ऊर्फ बाळू सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तिलारी कालवा विभागाचे बांदा शाखेचे सहाय्यक अभियंता अजित पाटील यांची भेट घेऊन त्यांचे लक्ष वेधले.
बांदा शाखा कालवा सुमारे २२ किलोमीटर लांबीचा असून या कालव्यावर परिसरातील शेती आणि पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अवलंबित्व आहे. सध्या पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. विहिरी, कूपनलिका तसेच अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठ्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कालव्याचे पाणी वेळेत उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. त्यामुळे कालवा सुरू करण्यापूर्वी त्याची सद्यस्थिती तपासून आवश्यक ती कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, अशी भूमिका खतीब व सावंत यांनी मांडली.
कालव्याची लांबी लक्षात घेता संपूर्ण मार्गाचे तातडीने सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. कालव्यामध्ये अनेक ठिकाणी झाडेझुडपे, गवत वाढले असून त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळे निर्माण होऊ शकतात. तसेच काही ठिकाणी गळती (लिकेज) होत असल्यास ती शोधून तातडीने दुरुस्त करावी. कालव्याची साफसफाई, गाळ काढणे, झाडेझुडपे हटविणे आणि आवश्यक ठिकाणी बांधकामाची दुरुस्ती करणे ही कामे प्राधान्याने हाती घ्यावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी येत्या १२ जानेवारी रोजी बांदा शाखा कालवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मात्र, कालवा सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेली साफसफाई व दुरुस्तीची कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचे खतीब व सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. कालव्यामधून पाणी सोडल्यानंतर गळती व अडथळ्यांमुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये, तसेच शेवटच्या टोकापर्यंत पाण्याचा प्रवाह सुरळीत पोहोचावा, यासाठी संबंधित विभागाने नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण करावीत. पावसाचे प्रमाण कमी असताना उपलब्ध जलस्रोतांचा योग्य वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे केवळ कालवा सुरू करण्याची तारीख निश्चित न करता प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी माजी उपसरपंच जावेद खतीब आणि राजाराम ऊर्फ बाळू सावंत यांनी केली आहे.
