देवगड तालुक्यातील चार पदांसाठी १६५ उमेदवारांचे अर्ज पात्र; तहसीलदार शीतल जाधव यांची माहिती

देवगड (प्रतिनिधी)
राज्यातील महसूल सेवक (कोतवाल) पदभरती २०२६ अंतर्गत कोकण विभागासाठी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी नियोजित करण्यात आलेली लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना नव्या वेळापत्रकानुसार परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या ५ नोव्हेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेली वयोमर्यादेची शिथिलता महसूल सेवक पदभरतीस लागू करण्याबाबत शासन स्तरावर अभिप्राय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने १५ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेली लेखी परीक्षा तूर्त पुढे ढकलण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, देवगड तालुक्यातील चार महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या भरतीसाठी एकूण १६५ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत. या भरती प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार लेखी परीक्षा १७ जानेवारी २०२७ रोजी आयोजित करण्यात येणार आहे.
सुधारित परीक्षेच्या तारखेची सर्व पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन देवगडच्या तहसीलदार शीतल जाधव यांनी केले आहे.
