जुन्या संघर्षमय आठवणींना बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी दिला उजाळा:माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेलींनी केला जुन्या शिवसैनिकांचा गौरव..

⚡कणकवली ता.१३-: मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि सर्वसामान्यांच्या न्याय्य प्रश्नांसाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक शिवसैनिकांनी त्या काळात तन-मन-धन अर्पण करून शिवसेनेचे काम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, कोणतीही अपेक्षा न ठेवता संघटना वाढविण्यासाठी केलेल्या जुन्या संघर्षमय आठवणींना पुन्हा शिवसैनिकांनी उजाळा दिला.
जरी अनेकांचे वय आता वाढलेले असले तरी एक आपुलकीचा जिव्हाळा शेवटच्या टप्प्यांत नव्याने निर्माण करण्याचा प्रयत्न 1983 मधील जुन्या शिवसैनिकांना एकत्रित स्नेहमेळावा करत त्यांचा गौरव करण्याचा प्रयत्न माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांनी केला.
कणकवली तालुक्यातील हुंबरट येथील हॉटेल सावली येथे या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १९८३ ते १९९० या काळात शिवसेनेसाठी केलेल्या संघर्षाची पुन्हा उजळणी या मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आली.
या स्नेहमेळाव्याला माजी आमदार परशुराम उपरकर,राजन तेली, राजू शेटये, राजू राणे, सुरेश लोके, विठ्ठल देसाई, सतीश कदम, जयसिंग नाईक, गुरुनाथ पावसकर, संजय मालंडकर, अनिल हळदिवे, कांता दळवी, राजन पारकर, नंदू आरोलकर, बाळा राणे, संतोष सावंत, संजय शिरसाट, विलास गुडेकर, उत्तम वाळके, श्रीकृष्ण राणे, भाई बोंद्रे, बाळा पाटकर, नारायण कुबल, रमेश जोगळे, वैभव काणेकर, श्री. हिर्लेकर, बबन कर्णिक , रवी सावंत आदी उपस्थित होते.
त्यावेळी शिवसेनेत काम केलेल्या परंतु आता स्वर्गवासी झालेल्या जुन्या शिवसैनिकांची आठवण काढत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच जुन्या शिवसैनिकांच्या योगदानाचा गौरव माजी आमदार परशुराम उपरकर, राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला.
परशुराम उपरकर म्हणाले, १९८३ पासून कणकवली तालुक्यातील शिवसैनिकांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघटनेचे काम केले. अनेकदा उपाशीपोटी राहून, एकमेकांना सहकार्य करत त्यांनी शिवसेना वाढविण्यासाठी मेहनत घेतली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा विचार डोळ्यासमोर ठेवून त्या काळातील शिवसैनिकांनी काम केले. खारेपाटणला ठेच लागली तर ओसरगावला त्याची जाणीव होणारी एकजुटीची भावना त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये होती.
याच निष्ठावंत शिवसैनिकांच्या बळावर शिवसेना वाढली आणि आम्हालाही राजकारणात पुढे जाण्याची संधी मिळाली. आज आम्ही आमदार पदापर्यंत पोहोचलो, त्यामागे जुन्या शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे.आज अनेक जुने शिवसैनिक वेगवेगळ्या राजकीय पक्षांत कार्यरत असले तरी शिवसैनिक म्हणून असलेले जुने नाते कायम आहे.
राजन तेली म्हणाले, त्यावेळी संघर्षमय केलेल्या कामांमुळे शिवसेना गावागावांत रुजली. १९८६ मधील नांदगाव येथील घटना तसेच सिंधुदुर्ग किल्ल्यावर भगवा झेंडा कापण्यात आल्याच्या घटनेनंतर झालेल्या आंदोलनांचा उल्लेख करत त्यांनी जुन्या शिवसैनिकांच्या संघर्षाची आठवण आजही कायम आहे. वामनराव महाडिक आणि नारायण राणे यांच्यापासून जिल्ह्यातील शिवसेनेच्या वाटचालीला दिशा मिळाली.
नंदू आरोलकर, परशुराम उपरकर, आपण स्वतः, गुरुनाथ पावसकर यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी त्या काळात संघटनेसाठी काम केले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांनी स्वतःच्या मेहनतीवर संघटना वाढवली. त्यांच्या सहकार्यामुळेच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आमदार होण्याची आणि विविध पदे भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे या सर्व जुन्या शिवसैनिकांचे ऋणी आहे.
अनेक वर्षे लोटल्यानंतर पुन्हा ऋणानुबंध – जुन्या शिवसैनिकांच्या स्नेहमेळाव्यामुळे अनेक वर्षांनंतर जुने सहकारी एकत्र आले होते. बऱ्याच वर्षानंतर काहीजण विविध राजकीय पक्षांमध्ये काम करत आहेत. परंतु, त्यावेळीचा असलेला भावनिक ओलावा आजही मात्र कायम असल्याचे दिसून येत होते. राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी जुन्या मैत्रीचे आणि संघटनात्मक संघर्षाचे नाते आजही कायम आहे. त्या शिवसैनिकांमध्ये अनेक वर्षे लोटल्यानंतर पुन्हा ऋणानुबंध कायम असल्याचे दिसून आले.
