१ डिसेंबरपर्यंत नावनोंदणीची संधी

मालवण दि (प्रतिनिधी) :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुणांना परदेशातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना स्वावलंबी बनता यावे, या उद्देशाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आणि स. का. पाटील कला, वाणिज्य व देशभक्त शंकरराव गवाणकर विज्ञान महाविद्यालय, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने एक महिन्याचा ऑनलाइन जर्मन भाषा फाउंडेशन कोर्स आयोजित करण्यात आला आहे.
जर्मनीमध्ये कुशल कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज असून, जर्मन भाषेचे ज्ञान असलेल्या तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्राथमिक ज्ञान मिळावे आणि भविष्यातील संधींचा लाभ घेता यावा, या हेतूने प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये जर्मन भाषेची लिपी, व्याकरण, भाषेची वैशिष्ट्ये, संस्कृती, शिष्टाचार, संवाद कौशल्य, बोलण्यातील नम्रता आणि दैनंदिन संभाषणाचा सराव यावर भर दिला जाणार आहे. या कोर्ससाठी जर्मन भाषेचे पूर्वज्ञान आवश्यक नाही. संपूर्ण एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी एक हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
जर्मन भाषेवर प्रभुत्व असलेल्या तसेच भाषाशास्त्राचा अभ्यास असलेल्या गार्गी राऊत या प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या प्रशिक्षणासाठी १८ ते ३० वर्षे वयोगटातील दहावी, बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी पात्र आहेत.
इच्छुकांनी १ डिसेंबर २०२६ पूर्वी महाविद्यालयात नावनोंदणी करावी, तसेच अधिक माहितीसाठी प्रभारी प्राचार्य कैलास राबते (८३८१०२२५२९), प्रा. डॉ. उज्वला सामंत (९४२१२६१४३९), प्रा. डॉ. एम. आर. खोत (८७६७५८६२६९) व प्रा. डॉ. देविदास हारगिले (९४२११८९९०७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
