Headlines

‘चिमणी पाखरां’ची नृत्यभरारी, नऊ कलाकारांची थेट मुंबईच्या सांस्कृतिक मंचावर झेप..

नृत्य कलाकारांचं स्वागत रॅली काढून कुडाळात जल्लोषी स्वागत:रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ चित्रपटातही दिसणार हेच नऊ कलाकार..

⚡कुडाळ ता.१३-: ‘सुंदरी’ फेम नृत्यांगना दीक्षा नाईक हिच्यानंतर कुडाळच्या ‘चिमणी पाखरं डान्स अकादमी’च्या आणखी आठ नृत्यकलाकारांना सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि ‘लावणी किंग’ आशिष पाटील यांच्या ‘गोंधळी’ या नृत्य कार्यक्रमात नृत्य सादरीकरणाची संधी मिळाली आहे. गुरुवारी, १२ नोव्हेंबर रोजी मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे या नऊ कलाकारांनी आशिष पाटील यांच्यासोबत नृत्य सादर करून आपल्या कलेची छाप उमटवली. विशेष म्हणजे, येत्या १४ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ या मराठी चित्रपटातही हेच नऊ कलाकार नृत्य करताना दिसणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल शुक्रवारी कुडाळमध्ये अभिनंदन रॅली काढून त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या कुडाळच्या ‘चिमणी पाखरं डान्स अकादमी’च्या कलाकारांनी पुन्हा एकदा आपल्या नृत्यकौशल्याच्या जोरावर मोठी भरारी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी या अकादमीची नृत्यांगना दीक्षा नाईक हिची आशिष पाटील यांच्या ‘सुंदरी’ या कार्यक्रमासाठी निवड झाली होती. त्यानंतर आशिष पाटील यांनी कुडाळला भेट देऊन ‘चिमणी पाखरं’च्या कलाकारांची नृत्यकला पाहिली. त्यांच्या सादरीकरणाने प्रभावित होऊन त्यांनी आठ कलाकारांना आपल्या ‘गोंधळी’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी दिली. त्यानुसार मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात दीक्षा नाईकसह संजना पवार, साक्षी परब, सिमरन नायर, तनिषा नाईक, विशाखा धामापूरकर, अंतरा ठाकूर, सलोनी सावंत आणि प्राची जाधव या नऊ कलाकारांनी आशिष पाटील यांच्यासोबत नृत्य सादर केले.
या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ या आगामी मराठी चित्रपटातही या नऊ कलाकारांना नृत्य करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे ‘चिमणी पाखरं’च्या कलाकारांसाठी चित्रपटसृष्टीची दारे खुली झाली आहेत.
या कलाकारांचे शुक्रवारी सायंकाळी कुडाळमध्ये आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ स्वागतासाठी कुडाळवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी रवी कुडाळकर आणि रंगकर्मी बंड्या जोशी यांनी कलाकारांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर कुडाळवासीयांच्या वतीने बंड्या जोशी यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात या कलाकारांची स्वागत मिरवणूक काढण्यात आली. टेम्पोतून काढण्यात आलेल्या या मिरवणुकीचे मार्गावर ठिकठिकाणी फटाके फोडून आणि शुभेच्छांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. आशिष पाटील यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत आनंददायी आणि अविस्मरणीय असल्याची भावना या कलाकारांनी व्यक्त केली.
दीक्षा नाईक हिच्यानंतर ‘चिमणी पाखरं’चे आणखी आठ कलाकार चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असल्याचा मनस्वी आनंद असल्याची भावना अकादमीचे संचालक आणि कोरिओग्राफर रवी कुडाळकर यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या स्वागत मिरवणुकीची सांगता कुडाळ हायस्कूल येथे झाली. या संपूर्ण मिरवणुकीदरम्यान अनेकांनी कलाकारांचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. यावेळी ‘चिमणी पाखरं’चे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page